धाराशिव/ प्रतिनिधी-

ग्रेड पे वाढीच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेेने जाहीर केल्यानुसार आज (दि.3) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा तहसिलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील तहसिलदार, नायब तहसिलदार सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे महसूलसह विविध विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नसल्याने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. शासनस्तरावर मागणीचा अद्याप कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे राजपत्रित वर्ग-2 चे ग्रेडपे 4800/- करण्याबाबत संघटनेच्या वतीने यापूर्वी बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. तेव्हा तत्कालीन अपर मुख्य सचिव, महसूल मंत्री व वित्त मंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे तसेच के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समितीने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे 4800/- वाढविण्याबाबत सादरीकरण करुन देखील मागणीचा कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे नायब तहसिलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून संघटनेच्या वतीने सोमवार, 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. 

 धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसिलदार गणेश माळी, सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, (तुळजापूर), आर.एम. देवणीकर (परंडा), नाथाजी पाटील (भूम), प्रवीण पांडे तहसिलदार (महसूल) नरसिंग जाधव तहसीलदार (वाशी), नायब तहसिलदार राजाराम केलूरकर, संतोष पाटील, एम.डी.पांचाळ, शि.सा.कदम, पी.एस.मुगावे, पी.डी. लोखंडे, मुस्तफा खोंदे, अमित भारती, चेतन पाटील, सुजीत वाबळे, संतोष बोथीकर, अर्चना मैंदर्गी, कुलदीप कुलकर्णी, पंकज मंदाडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसिलदार, नायब तहसिलदार सहभागी झाले होते.


 
Top