धाराशिव / प्रतिनिधी-

शेतात काम करताना अपंगत्व किंवा मृत्यू ओढावल्यास शेतकऱ्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा मिळतो. मात्र मागील दोन वर्षापासून दाखल झालेले धाराशिव जिल्ह्यातील १९४ प्रस्ताव रखडले होती. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी तीन वेळेस आंदोलने केली होती. त्यामुळे त्यांच्या आंदोलनास यश आले असून या शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात या शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकºयांना मिळणाऱ्या रक्कमेतून त्यांच्या कुटूंबास हातभार लागतो. सन २०१८-१९ या वर्षी जिल्हाभरातून १६१ प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल झाले होते. त्यापैकी ९३ प्रस्ताव मंजूर झाले होते. सन २०१९-२० साली २५८ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी १८४ प्रस्ताव मंजूर होवून त्यांना लाभ मिळाला आहे. सन २०२१-२२ रोजी २२० प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी १४२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर ७ एप्रिल ते २२ आॅगस्ट २०२२ या कालावधीत ७५ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ५२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. मात्र मागील सन २०२१-२२ मधील मंजूर असलेले १४२ व ७ एप्रिल ते २२ आॅगस्ट २०२२ या कालावधीत मंजूर ५२ प्रस्ताव असे एकूण १९४ प्रस्तावांचा विमा शेकऱ्यांना मिळत नव्हता. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नसाठी वाचा फोडण्यासाठी मागील दोन वर्षापासून तीन वेळा वेगवेगळी आंदोलने करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे रखडलेल्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. दुधगावकर यांच्या आंदोलनामुळे त्यास यश आल्याने या शेतकऱ्यांमधून दुधगावकर यांचे आभार मानले जात आहेत.


 
Top