धाराशिव / प्रतिनिधी-

नेतृत्व करण्यासाठी आज-काल राजकीय मंडळी आपल्या वारसांना राजकारणात पुढे आणत आहेत. नाईलाजाने लोक देखील त्यांना स्विकारत आहेत. मात्र ते जनतेच्या हिताचे मुलभूत व अत्यावश्यक प्रश्न सोडविण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. तर समाजाचे सर्व समावेशक प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षातून आलेले नेतृत्वच सातत्याने जनतेमध्ये जाऊन ते यशस्वीरीत्या सोडविण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळेच संघर्षातून आलेले नेतृत्व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. डॉ. रमेश जारे यांनी दि.२७ एप्रिल रोजी केले.

धाराशिव शहरातील कुरणे नगर येथील स्मृतीशेष ऍड भारती रोकडे यांच्या स्मरणार्थ झुंजार भारती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एम.आर. कांबळे, मुंबई महानगरपालिकेचे उपविभागीय निरीक्षक सुरेश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी थोरे, सुरेखा जगदाळे, अंकुरच्या प्रमुख अनिता जावळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा डॉ जारे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून महिलांचा विकास झाला पाहिजे. तर स्मृतीशेष ऍड. भारती रोकडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संघर्षमय कार्य समाजासमोर उभा केले होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यासाठी त्या सतत पुढाकार घेऊन धडपडत असत. त्यामुळे शिक्षणापेक्षा चळवळीतून निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांची धडपड वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोकडे यांची केस स्टडी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर सुरेश कांबळे म्हणाले की, समाजातील ज्या व्यक्तींना मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना दानशूर मंडळींनी पुढे येऊन मदत करावी असे सांगत भारतीय रोकडे यांचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच दत्ताजी थोरे म्हणाले की, अशा प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होत आले. तर ज्यांना हा पुरस्कार दिला यांच्या व आपल्या वाटचालीला खूप प्रेरणादायी आहे. कारण या पुरस्कार मूर्ती मुली रस्त्यावरचा कचऱ्यात शिक्षणाचे सोने हुडकीत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी चांगले काम करणाऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले. तर एम.आर. कांबळे म्हणाले की, गरीब घरातील मुले नेहमीच संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून न थकता ते सातत्याने काम करीत राहतात. तर श्रीमंत घरची मुले नेमकी याच्याविरुद्ध वागत असल्यामुळे आजचा हा पुरस्काराचा कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर चंद्रकला जाधव म्हणाल्या की, भारतीय रोकडे यांचे कार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. विशेष म्हणजे महिलांनी जिथे लाथ मारावी तिथे पाणी निघेल असे प्रयत्न करावेत. त्यामुळे प्रत्येक महिलेने संकट आले म्हणून आत्महत्या सारखा मार्ग न निवडतावर मात करणे हाच पर्याय असल्याची त्यांनी नमूद केले. यावेळी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या चंद्रकला जाधव यांचा झुंजार भारती संघर्ष पुरस्कार तर वडिलांचे छत्र नसलेल्या व पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत भंगार वेचून आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या धाराशिव येथील पूजा अप्पाराव पेठे व नेहा जीवन शिंदे या मुलींना झुंजार भारती शैक्षणिक पुरस्कार व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रथम तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संयोजक सुदेश माळाळे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top