धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय संविधानावर वारंवार राजकीय मंडळी बहुमताच्या जोरावर कलमे बदलून एक प्रकारे हल्लाच करीत आहेत. मात्र राज्य घटनेच्या सारनाम्यामध्ये अतिशय प्रचंड ताकद असल्यामुळे कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकत नाही. तसेच तुम्ही कितीही लावा शक्ती अन् कितीही लढवा युक्ती, तुम्ही करारे कितीही हल्ला..लय मजबूत भिमाचा किल्ला या आनंद शिंदे यांनी गायलेल्या गीताप्रमाणे हा किल्ला म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो किल्ला हे भारतीय संविधान असल्याचे ठाम प्रतिपादन लातूर येथील सुप्रसिद्ध समीक्षक प्रा डॉ अशोक नारनवरे यांनी दि.२६ एप्रिल रोजी केले.

धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उस्मानाबादच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते भारतीस संविधान आणि आजचे वास्तव या विषयावर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा रवी सुरवसे हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ नारनवरे म्हणाले की, भारतात सायमन कमिशन येण्यापूर्वी १९२८ साली ६ महिने खोलीत बंदिस्त करुन घेत सतत अभ्यास केला.   त्यांनी १८० पानांचा अहवाल तयार करुन सायमन कमिशनकडे स्वातंत्र्य, समता व बंधुता मिळाली पाहिजे यासह विविध मागण्या केल्या होत्या. त्यामुळे संविधानाच्या आरंभीलाच डॉ आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा अभ्यास सुरू केला होता असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यासाठी संपूर्ण भारतात संविधान परिषदा घेण्यात आल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये सर्व घटकांना न्याय देऊन समानता निर्माण केली आहे. तसेच १९१९ मध्ये भारतात फक्त श्रीमंत व शिकलेल्या पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता. परंतू त्यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून...एक माणूस, एक मत.. अशी तरतूद करून राजकीय समानता प्रस्थापित केल्यामुळे डॉ आंबेडकर हे भारतीय स्त्रियांचे भाग्यविधाते असल्याचे सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उद्योगधंदे संपूर्ण शेती ही सरकारच्या मालकीची केली आहे. मात्र हल्लीचे सरकार हे खाजगीकरण करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आज भारतीय राज्य घटनेवर प्रचंड हल्ले होत असून यामध्ये ६ डिसेंबर १९९२ बाबरी मशीद दंगल, २००२ गुजरातमधील गोध्रा हत्याकांड, शहाबानो प्रकरण, रोहित वेमुला आदींसह विविध माध्यमातून हल्ले करण्याचे काम सुरू असून हे समाजवादाचे फार मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार अनुरथ नागटिळक यांनी मानले. यावेळी स्त्री व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

........................................

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येकांनी आदर्श घ्यावा - डॉ. ओंबासे

 जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे म्हणाले की, डॉ आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा प्रचंड अभ्यास करून भारतीय संविधानात समता व बंधुता याचा समावेश केला आहे. हे संविधान आपले आदर्श ग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व समाज घटकांना संविधानाच्या माध्यमातून प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उभे केले आहे. विशेष म्हणजे जातीभेद कमी करणे आर्थिक दरी कमी करणे गरिबी कमी करून सर्व प्रकारची तरी कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांना समान पातळीवर आणण्यासाठी पुढच्या ५० वर्षाचा आपण संविधानाचे शंभरावे वर्ष साजरी करू त्यासाठी प्रत्येकाने भारतीय संविधानांचा व डॉ. आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

........................................

यावेळी अरुण बनसोडे, सुनील बनसोडे, धनंजय वाघमारे, बाबासाहेब जानराव, रवींद्र शिंदे, राजेंद्र धावारे, सुदेश माळाळे, अंकुश पेठे, अशोक बोराडे, प्रा.राम चंदनशिवे, विजय गायकवाड, मुरहरी कांबळे, शिवाजी गायकवाड, इंद्रजीत शिंदे, डॉ रमेश कांबळे, प्रा यशवंत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, स्वामीराव चंदनशिवे व संपत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top