धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय दक्षता पथक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफीक अंन्सारी व  सर्व तालुका  आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

   या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांचा आढावा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला यामध्ये एडस, टीबी, तंबाखु नियंत्रण कार्यक्रम आणि गर्भलिंग निदान विरोधी मोहीमेवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले, शाळा परीसरातील तंबाखू विकणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाही केली जाणार. विद्यार्थी आणि मुलांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देऊन शालेय आरोग्य कार्यक्रमाचीही प्रभावी अंमलबजावणी करावी.

 क्षयरुग्णांना पोषण आहारास मदत करण्यासाठी निक्षय मित्रांना आवाहन

 राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत माहे जानेवारी ते मार्च या कालावधीतील कामकाजाचा आढावा घेतला असता मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे तुलनेत संशयीत क्षयरुग्ण शोधण्याचे प्रमाणात लक्षणिय वाढ झाली असून सुध्दा नवीन क्षयरुग्ण निदानाच्या प्रमाणात घट झाली आहे. तरी सर्व वैद्यकिय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांना सुचना देऊन नवीन क्षयरुग्ण निदानाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याचे डॉ.ओम्बासे यांनी आदेशित केले.

 क्षयरुग्णांना औषधी बरोबर सकस आहाराची आवश्यकता असते. प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान या उपक्रमांतर्गत उपचाराखालील प्रती क्षयरुग्णांस किमान सहा महिन्याकरीता पोषण आहार म्हणून गहु किंवा ज्वारी- 3 किलो, दाळी- दीड किलो, खाद्यतेल- 250 ग्रॅम, दुध पावडर 1 किलो आदी असा कोरडा पोषण आहार किटच्या स्वरुपात निक्षय मित्राद्वारे दरमहा देणे अपेक्षित आहे. क्षयरुग्णांना पोषण आहारास मदत करण्यासाठी निक्षय मित्र म्हणून नोंदणी करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय अथवा संबंधित तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास संपर्क करावा आणि या उपक्रमांत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले.


 
Top