धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे धाराशिव लोकसभा मतदार संघामध्ये उत्तम संघटन असून प्रमाणिक, कष्टाळू व समर्पक कार्यकर्त्यांचा संच आहे. मोदीजींचे कार्य व लाभार्थ्यांना होत असलेली थेट मदत यामुळे देशवासियांचा प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावर मोठा विश्वास असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड यांनी काल दिनांक ०८ एप्रिल रोजी धाराशिव येथे घेतलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केला. 

 धाराशिव लोकसभा मतदार संघाची जबाबदारी ना. कराड यांच्यावर सोपविण्यात आले आहे. काल त्यांनी धाराशिव येथे लोकसभा कोअर समिती व या अंतर्गत समाविष्ट सहाही विधानसभा कोअर समिती सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये संबोधीत करताना ते म्हणाले की, मागील आठ वर्षांमध्ये देशाला प्रचंड विकास झाला असून ९ व्या स्थानावरील अर्थव्यवस्था आज ५ व्या स्थानी आली आहे. कोरोना महामारीच्या संकटात देखील देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात यश मिळविले आहे. देश आज विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असून त्याचे संपूर्ण श्रेय ना. नरेंद्रजी मोदी यांना जाते. देशात अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालये व आयुर्विद्यान संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. रस्त्याचे जाळे मजबूत करून दळणवळणाला मोठी चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची अभूतपूर्व प्रगती सुरू असून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आज लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून थेट मदत मिळत आहे. 

 पक्षात संघटन व सेवा कार्य अतिशय महत्त्वाचे असून कार्यक्रमांमध्ये समोर बसणारा माझ्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज राज्यमंत्र्यांच्या रूपाने तुमच्यासमोर उभा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कसोशीने निर्णय पाळणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज असून येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या ताकतीनिशी काम करेल, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. 

 सदरील बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील, धाराशिव लोकसभा प्रभारी श्री गुरुनाथ मगे, संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, सुधीर अण्णा पाटील, यांच्यासह धाराशिव लोकसभा व त्या अंतर्गत सहा  विधानसभा कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते


 
Top