परंडा / प्रतिनिधी-
"अखंड महाराष्ट्रासह आंध्रा व कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कंडारी येथील श्री काळ भैरवनाथ यात्रा उत्सवास कावड मिरवणुकीने मोठ्या थाटामाटात गुलाल खोबऱ्याची उधळण करत सुरूवात झाली .
कंडारी येथील काळभैरवनाथ यात्रा उत्सवाची काल चैत्र अष्टमी दिवशी दुपारी १ वाजता कावड मिरवणुकीने सुरुवात झाली.ढोल ताशांच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविक भक्त गुलालात न्हावून निघाले.मानाच्या सुतार नेटावरुन कावडीची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावातील गणेश मंदीर, मारुती मंदीर ,देशमुख गल्ली ते भैरवनाथ मंदीर या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक भक्तानी कावडीस लिंबू नारळाचे तोरण बांधले. अनेकांनी गुलाल व खोब-याची उधळण करून भैरुबाच्या नावान चांगभलं, देवाच्या कावडीच चांगभलं, आधी कंडारी मग सोनारी च्या देवाच चांगभलंच्या जयघोष परिसर दुमदुमून निघाला . . ढोल ताशा व हलगीच्या तालावर ठेका धरत भक्तगण कावड घेवून मंदीर परिसरात दाखल झाले . कावडीस आंघोळ घालून मंदीरासमोर कावड विसावली गेली . त्यानंतर गावकऱ्यांनी देवास अंबील व पुरण पोळीचा नैवेदय अर्पण केला . तत्पूर्वी पहाटे गावकऱ्यांनी ओल्या पडद्याने देवास दंडवत घातले.
रात्री १२ वाजता परंपरेनुसार भैरवनाथ जोगेश्वरी विवाह लावण्यात आला. यावेळी ह भ प सागर महाराज काचोळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पडघण, उद्योजक भैरवनाथ शिंदे, युवासेना तालुका प्रमुख तथा सरपंच राहूल भैया डोके, माजी जि प सदस्य धनंजय मोरे, पै विशाल देवकर, हनुमंत शिंदे, अमोल देशमुख, चेअरमन भाऊसाहेब तिंबोळे, दिलीप मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य सारंग घोगरे, स्वाभिमानीचे शंकर घोगरे यांचे सह आजी- माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवरांसह हजारो भाविक भक्त विवाह प्रसंगी मोठ्या संखेने उपस्थित होते.