धाराशिव / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम चे हे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समितीमार्फत विविध उपक्रम साजरी करण्यात येत आहेत.

 मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे योगदान सर्वाधिक असून या भूमीतूनच या संग्रामाला सुरुवात देखील झालेली आहे. या मुक्तीसंग्राम मध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले असून आपले रक्त सांडलेले आहे, आणि कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य देखील प्राप्त झालेले आहे. या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल आणि हुतात्म्यांच्या स्मरणार्थ शासनातर्फे जिल्ह्यामध्ये यापूर्वी 12 ठिकाणी हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आलेली आहे.

  मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी हे गाव जाळून बेचिराख करून टाकण्यात आलेले होते. तसेच आंबेजवळगे या ठिकाणीही एका स्वातंत्रसैनिकास हौतात्म्य प्राप्त झालेले होते, त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील केशेगाव या ठिकाणी देखील एका स्वातंत्रसैनिकास हौतात्म्य प्राप्त झालेले होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्याचारी निजामशाहीच्या विरोधात पोलीस ॲक्शन सुरू करताना उस्मानाबाद तालुक्यातील आळणी या ठिकाणी भारतीय सेना मार्फत पहिले आक्रमण या ठिकाणी करण्यात आले होते. या सर्व ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व असून या चारही ठिकाणी शासनाने हुतात्मा स्मृतीस्तंभाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती चे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी केले आहे.

 
Top