धाराशिव / प्रतिनिधी-

विविध विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान राज्यभरात 15 एप्रिल पासून ते 15 जून पर्यंत राबविला जाणार आहे. या अभियानात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद तसेच शासकीय विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये अशा प्रकारच्या शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे केले.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ कळंबच्या तहसीलदार मनिषा मोरे खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील शिराढोणचे सरपंच नितीन पाटील तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या बचत गटातील महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि इतर दुकानांची मांडणी केली होती.

जिल्हाधिकारी म्हणाले ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतरस्त्यांची अडचण खूप मोठी असते त्यामुळे तहसीलदारांनी प्रधान्याने शेतरस्त्यांची प्रकरणे सुनावणी घेऊन पावसाळ्यापूर्वी निकाली काढावीत व शेतरस्ते मोकळे करावे. यासाठी महा राजस्व अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांच्या समन्वयाने शेतरस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू आहे. पुढे जिल्हाधिकारी म्हणाले ग्रामीण भागातला आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे वारस हक्क आणि घरातील  व भाऊ बहीणीत जमिनीची वाटणी असते. यासाठी जमीन महसूल संहितेच्या कलम 85 नुसार शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सर्वांच्या सहमतीने जागेची वाटणी सोप्या पद्धतीने करणे शक्य आहे तेव्हा याचाही लाभ सर्वांनी घ्यावा.

 वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करण्यावरही लक्ष द्यावे हा कमी मेहनतीचा आणि जास्त नफ्याचा उद्योग असून अनेक शेतकऱ्यांनी या उद्योगातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यासाठी लागणाऱ्या शेड साठी बॅंकांकडून कर्ज देण्यात येते. याबाबत बँकांनाही सूचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिलांना पाच ते पन्नास लाख कर्ज रुपयापर्यंतचे तसेच 35 टक्के सबसिडी देण्यात येते ही अतिशय चांगली योजना असून महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

 जल जीवन मिशन अंतर्गत खामसवाडी येथे 22 कोटी रुपयांची कामे होत आहेत. ही कामे चांगल्या दर्जाची व्हावे यासाठी ग्रामपंचायत व स्वतः ग्रामस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील पाण्याचे टाक्या आणि पाईपलाईन उत्कृष्ट दर्जाची व्हावी याकडे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक असल्याने या गावाचे काम उत्कृष्ट व्हावी यासाठी कंत्राटदाराकडून काम करून घेणे ही आपली जबाबदारी असल्याचेही डॉ. सचिन ओम्बासे यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पी एम किसान योजना रोजगार हमी योजना, आरोग्य विभागातील योजना समाज कल्याण विभागातील विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचे घर आणि अन्न मिळालं यासाठी शासनाकडून योजल्या जाणाऱ्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हधिकारी यांनी  यावेळी केले.


 
Top