धाराशिव / प्रतिनिधी-

 पुस्तकच माणसाचे मस्तक संपन्न करते. विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल अभिरुची व आपुलकी वाटावी म्हणून मराठवाड्यातील सर्व माध्यमिक,उच्च माध्यमिक,वरिष्ठ महाविद्यालय व इतर अनुदानित शाळांना प्रत्येकी 31 हजार रुपयांचे 300 ग्रंथ आमदार निधीतून देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले.

 राष्ट्रवादी शिक्षक संघ उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने रामकृष्ण परमहंस  महाविद्यालय उस्मानाबाद येथे बुधवार दिनांक 26 रोजी जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये व आश्रम शाळा यांना विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून पुस्तकांचा वितरण सोहळ्यात आ विक्रम काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे होते.यावेळी व्यासपीठावर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता  उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, माजी सिनेट सदस्य नितीन बागल, प्रा. डॉ. एस एस फुलसागर, खलील सय्यद,समाज कल्याण विभागाचे विकास राठोड आदींची उपस्थिती होती

 आ काळे पुढे म्हणाले की खाजगी माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळांना 81 लाख 75 हजार रुपयांचा निधी दिला होता मात्र जिल्हा परिषद उस्मानाबादच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांच्या आडमुठ्या, चुकीच्या व नाकर्त्या भूमिकेमुळे तो निधी परत गेला. गजानन सुसर या कामचुकार शिक्षणाधिकाऱ्यावर  कारवाई करावी अशी मागणी त्यांनी वरिष्ठाकडे केली आहे.

 राहुल गुप्ता म्हणाले की शाळा शाळांमध्ये सक्षम ग्रंथालये उभी करणे काळाची गरज आहे. शिक्षकांनी गुणवत्ता व वाचनाचे मापदंड यास प्राधान्य द्यावे.  पुस्तके उपलब्ध करून दिली तर ज्ञान आत्मसात करण्याच्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आपोआप रुंदावतील.

 यावेळी विश्वास अप्पा शिंदे,धनंजय रणदिवे, नितीन बागल यांची भाषणे झाली.

 आमदार काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून जिल्ह्यातील 22 वरिष्ठ महाविद्यालय १५ व्ही जे एन टी, आदिवासी व अनुसूचित जाती आश्रम शाळांना 31 हजार रुपयांचे 300 ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.हरिदास फेरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. वैभव आगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे,  सरचिटणीस राजकुमार मेंढेकर, उपाध्यक्ष संभाजी गायकवाड,नारायण खैरे, प्रा.लक्ष्मण भरगंडे, मुख्याध्यापक राजेंद्र मडके,एकनाथ चव्हाण, शहराध्यक्ष प्रा.राहुल पाटील तुळशीदास पिसे, सुहास वडणे, चंद्रकांत साळुंखे,संजय कावळे गणेश माने, प्रा. डॉ.संदीप देशमुख आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्राचार्य, प्राध्यापक,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पुस्तक प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे यांनी मानले.

 
Top