धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्हास्तरीय निविष्ठा सनियंत्रण समिती सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. खरीप हंगाम 2023 जवळ आलेला असून कृषी विभागाकडून खरीपचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून खरीपचे 6 लाख 30 हजार 800 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक म्हणजे 4 लाख 46 हजार 948 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. यासोबतच मका, तूर, उडीद, मूगाचीही पेरणी होईल. त्यादृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातून 81 हजार 879 क्विंटल बियाणे व खाजगी क्षेत्रातून 27 हजार 293 क्विंटल बियाणे असे एकूण एक लाख 9 हजार 171 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यासाठी रासायनिक खताचे 76 हजार 900 मे. टनाचे आवंटन मंजूर झाले आहे. रासायनिक खताचा जिल्ह्याचा सरासरी वापर 66 हजार 891 मे.टन असून आज अखेरपर्यंत 52 हजार 883 मे. टन खते जिल्ह्यास उपलब्ध आहेत. उपलब्ध असणारे घरगुती सोयाबीन बियाणे उगवणशक्ती तपासून वापरणे तसेच पेरणीपुर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

  कृषी निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर 8 असे एकूण 9 भरारी पथकाची स्थापना केली असून त्याद्वारे सनियंत्रण करण्यात येत आहे. याअनुषंगाने कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खत विक्री न करणे, लिंकींग न करणे, ई-पॉस चा साठा व प्रत्यक्ष खत साठा तात्काळ हा जुळला पाहिजे. सोयाबीन बियाणे साठवणूक व विक्री करताना काळजी घेणे तसेच बियाणे, खते व किटकनाशके कायद्याचे पालन करुन सर्व कृषी निविष्ठा केंद्र तसेच वितरकांनी चांगल्या दर्जाच्या कृषी निविष्ठा पूरवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

  शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी किंवा तक्रारी सोडविण्यासाठी 02472-223794 या नंबरवर संपर्क साधता येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी सेवानिहाय उपलब्ध खत साठा पाहण्यासाठी कृषीक अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित रासायनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्यांकडून ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत तसेच या संदर्भात तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.


 
Top