धाराशिव / प्रतिनिधी-  

धाराशिव जिल्ह्यातील 8 बाजार समिती निकाल जाहीर  झाले असुन या निकालात महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळाला. 8 पैकी 5 बाजार समिती मिळवत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने यश मिळवले तर भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीला 3 बाजार समिती जागावर समाधान मानावे लागले.

आमदार राणा पाटील यांनी महायुतीची वाचवली तर पालकमंत्री डॉ सावंत यांनी घालवली असेच काहीसे चित्र समोर आले. होम पिचवर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी मंत्री बसवराज पाटील वगळता सर्व दिग्गज नेत्यांच्या पॅनलचा होमपिचवर पराभव झाला त्यामुळे राणा पाटील व बसवराज पाटील हे 2 बाजार समिती ताब्यात घेत निवडणुक आखाड्याचे मॅन ऑफ द सिरीज ठरले. कही खुशी, कही गम अश्या स्तिथीत कार्यकर्ते यांनी समाधान मानत गुलाल, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 144 संचालक जागापैकी 69 जागा महाविकास आघाडी तर 75 जागा ह्या महायुतीला मिळाल्या त्यामुळे विजयी संचालकांच्या आकड्यात महायुती सरस ठरली.

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळे महायुतीला धाराशिव व तुळजापूर बाजार समितीत मोठे यश मिळाले. आमदार राणा पाटील यांच्यामुळे युतीला चांगले यश मिळाले तर पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. मंत्री सावंत यांच्या मतदार संघ असलेल्या भागात परंडा व वाशी या 2 बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने यश मिळविले तर मंत्री सावंत यांना केवळ एक भुम बाजार समिती मिळाली. महाविकास आघाडीला कळंब, परंडा, मुरूम, उमरगा व वाशी येथे मोठे यश मिळाले तर महायुतीला धाराशिव तुळजापूर व भुम येथे विजय मिळाला.

धाराशिव बाजार समितीत विक्रमी 17 जागा घेत महायुतीने विजय मिळवीत महाविकास आघाडीचा सफाया केला. काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर वगळता सर्व उमेदवार पराभूत झाले. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी येथे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना क्लीन स्विप दिला व आमदार पाटील यांनी धाराशिव येथे असलेली पकड दाखवून दिली. विशेष म्हणजे धाराशिव येथे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते असताना केवळ एकच जागा मिळाली.

कळंब बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने 11 जागा घेत मोठे यश संपादन केले या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे प्रचार दरम्यान भावनिक होत अश्रू ढाळले होते त्यामुळे भावनिक मुद्दा ठरला होता मात्र या ठिकाणी आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांची जादू चालली.

तुळजापूर बाजार समितीमध्ये भाजपने 14 जागा घेत विजय मिळावीला तर महाविकास आघाडीला केवळ 4 जागा मिळाल्या या ठिकाणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना अपेक्षित धक्का बसला.

उमरगा येथे महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या असुन येथे 7 जागा शिवसेना भाजपला मिळाल्या. उमरगा येथे माजी खासदार रवींद्र गायकवाड व शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना माजी मंत्री बसवराज पाटील यांनी जोरका धक्का दिला. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वात पॅनलने मुरूम येथे निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. मुरूम येथे महाविकास आघाडीला 15 तर 3 जागा महायुतीला मिळाल्या.

मंत्री डॉ तानाजी सावंत यांना त्याच्या मतदार संघात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे या जोडगोळीने पालकमंत्री मंत्री तानाजी सावंत व भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना चांगला धक्का दिला.भुम बाजार समितीमध्ये भाजप शिवसेना शिंदे महायुतीला 16 जागा मिळाल्या. राहुल मोटे यांच्या बालेकिल्लात सावंत यांनी दणका दिला तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा येथे 13 जागा घेत विजय खेचून आणला, परंडा येथे सावंत यांना होमपिचवर पराभव पाहावा लागला. परंडा येथे सावंत गटाला 5 जागा मिळाल्या. वाशी येथे महाविकास आघाडीने 12 जागा मिळवत ताबा मिळवीला येथे शिवसेना शिंदे व भाजप गटाला 6 जागा मिळाल्या. 

धाराशिव बाजार समिती येथे होमपिचवर आमदार कैलास पाटील, भुम येथे माजी आमदार राहुल मोटे, परंडा येथे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, तुळजापूर येथे मधुकरराव चव्हाण, उमरगा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले पॅनल पराभूत झाले तर तुळजापूर बाजार समितीत स्थानिक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात पॅनलने विजयश्री मिळविली तर माजी आमदार बसवराज पाटील यांनी मुरूम व उमरगा हे कायम राखले.

 
Top