धाराशिव / प्रतिनिधी-

दिवंगत लेखक अ‍ॅड. वा. मा. वाघमारे यांचे लेखन म्हणजे प्रबुध्द विचाराचा अस्सल दस्तावेज असल्याचे मत प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने वाघमारे लिखित चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा धाराशिव येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

दिवंगत कवी तथा कथा लेखक अ‍ॅड. वा. मा. वाघमारे लिखित दीपस्तंभ, मोकळा श्वास, वळणवाटा आणि डोळे भरून पाहु दे या चार पुस्तकांचे प्रकाशन मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक के. व्ही. सरवदे, अ‍ॅड. राज कुलकर्णी, वेणूताई वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अ‍ॅड. अविष्कार वाघमारे यांनी प्रास्ताविकपर भूमिका व्यक्त केली. त्यानंतर वा. मा. वाघमारे यांनी आपल्या नैतिक मुल्याच्या आग्रहातून आपली कशा पध्दतीने जडणघडण केली, याबद्दल अ‍ॅड. अस्मिता काटे यांनी मनोगत व्यक्त केले. सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी वाघमारे यांच्या साहित्यकृतीमधील अनेक मुद्दे विस्तृतपणे सांगितले.  जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हे लेखन पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. तर अ‍ॅड. राज कुलकर्णी यांनी वा. मा. वाघमारे यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. जिल्हा विधीज्ञ मंडळात त्यांच्या पुढाकारातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीउत्सवाचा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. ज्येष्ठ लेखक के. व्ही. सरवदे यांनी उमेदीच्या काळापासून वाघमारे यांनी केलेल्या लेखनाचा धावता आढावा आपल्या मनोगतातून मांडला. अध्यक्षीय समारोपात नितीन तावडे यांनी वाघमारे यांची प्रेरणा नेहमीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी तर आभार प्रा. डॉ. सविता वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाघमारे व काटे पविाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहर व परिसरातील साहित्य रसीक बहुसंख्येने उपस्थित होते. 

 
Top