परंडा / प्रतिनिधी-

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी मी आसीयुमध्ये उपचार घेत असताना जिल्हा बँक संचालक पदाच्या अपात्रतेची नोटीस पाठविण्याचे कपट राजकारण केले. जिल्हयाच्या राजकारणात त्यांना मी आणले. परंतू माझ्यासोबतच ते कपट नीती वापरत आहेत. सत्ता येत असते जात असते  परंतू सत्तेची मस्ती योग्य नाही, असा खणखणीत इशारा भूम-परंड्याचे ठाकरे गटाचे माजी अामदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

आज (दि, ५) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचे नोटीस पाठवून आजारपणात त्रास देणाऱ्या सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला थोडी लाज असेल,तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जा. मग जनता ठरवेल त्यांना कोणता नेता पाहिजे. ते आम्ही मान्य करु, असे आवाहन पाटील यांनी सावंत यांना दिले आहे.

 ज्यांना बोटाला धरून जिल्ह्याचे राजकारण शिकवलं, राजकारणात संधी दिली त्यांनीच माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन रुग्णालयातील आय.सी.यु. मध्ये असताना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची नोटीस पाठवून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. विभागीय सहनिबंधक कार्यालयात दि. ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली असताना, दि.१० फेब्रुवारी रोजी नोटीस प्राप्त झाली. या कालावधीत मी दि. ११ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात आय.सी.यु. मध्ये होतो. सावंत यांनी कपटी राजकारण केले व विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाटकर यांनी नोटीसला उत्तर देण्याची संधी मला दिली नाही, असेही  माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.


 
Top