न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन

 धाराशिव / प्रतिनिधी-

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे कळंबवासीयांचे 30 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असून न्याय मंदिराचे पावित्र्य कायम ठेवून न्यायालय स्वच्छ व सुंदर ठेवावे. या सुसज्ज व सुदंर इमारतीत सर्वांच्या सहकार्याने चांगल्या वातावरणात न्यायदानाचे काम पार पडणार आहे. ई-प्रणाली आणि आधुनिक सोयी-सुविधांमुळे कामाचा दर्जा अधिक वाढणार असून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी केले. कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी उच्च न्यायालय ,मुंबई औरंगाबाद खंडपीठचे तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अरूण रामानाथ पेडणेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू एस.शेंडे ,जिल्ह न्यायाधीश राजेश गुप्ता,जि. न्या. विश्वास मोहिते,जि. न्या. श्री. अग्रवाल, जि. न्या. श्री करवे, कळंब अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश किरण बागे-पाटील,दिवाणी न्यायाधीश श्री.गोडसे(व.स्तर), दिवाणी न्यायाधीश रविंद्र प्रल्हाद बाठे(क.स्तर), कळंब विधीज्ञ मंडाळाचे अध्यक्ष ॲड. दत्ता सुंदरराव पवार,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव, भूम,परांडा, वाशी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील  न्यायालयातील विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, पक्षकार आदीची उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते जेष्ठ विधीज्ञांचा सत्कार करण्यात आला.

 अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य व सुसज्ज व सोयी सुविधायुक्त प्रशस्त अशा इमारतीची पाहणी न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी केली. ते म्हणाले पहिले मी वकील होतो नंतर न्यायाधीश झालो आणि आज न्यायालयाच्या उद्घाटनाचे सौभाग्य मिळाले,हे आई वडीलांचा आशिर्वाद आणि ईश्वराच्या कृपेमुळे शक्य झाले. न्यायदान हे पुण्याचे काम आहे. न्यायाधीश न्यायदाता म्हणून जितका सक्षम आहे तितकाच आरोपीची बाजू सक्षमपणे मांडुन निर्दोश सिध्द करण्याची किमया करणारा वकीलही पुण्य कमावतो असेही न्यायमूर्ती घुगे यावेळी म्हणाले.

 या न्यायालयाच्या उभारणीत अनेकांचे श्रेय असून ही आधुनिक इमारत सर्व सुविधेसह उभारली आहे. सध्या न्यायालयीन कामकाजात ई-कोर्ट सुविधा आली असून कळंब येथे 2019 पासून या प्रणालीचा वापर होत आहे.भविष्य ई-फिलिंगचाच आहे, कळंब येथील विधीज्ञ आणि न्यायालयीन अधिका-यांनी ई-फिलिंगचा अवलंब करणे कौतुकास्पद आहे.सध्या उस्मानाबाद जिल्हा ई-प्रणालीमध्ये प्रगत झाला आहे. असे न्यायमूर्ती घुगे म्हणाले.

 पालक न्यायमूर्ती अरुण रामानाथ पेडणेकर म्हणाले, कळंब येथे नुतन इमारतीचे उद्घाटन हे येथील विधी व न्यायासाठी काम करणा-या वकील,अधिकारी आणि पक्षकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.लोकशाहीत कायदा मंडळ आणि न्यायसंस्थांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे न्याय प्रणालीमध्ये महिलांचा समावेशही तितकाच महत्वाचा आहे. येथील बार कौंसिलमध्ये महिला वकीलांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या पुढाकाराने ही ईमारत पूर्णत्वास आली आहे. कळंबच्या नागरिकांना आणि विधीज्ञ मंडळाला मी शुभेच्छा देतो,असेही श्री.पेडणेकर म्हणाले.

 प्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या नुतन इमारतीला पूर्णत्वास आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.त्या म्हणाल्या या इमारतीच्या कामासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला.कामाची गती वाढवण्यासाठी अधिका-यांची विशेष टीम तयार करण्यात आली आणि बांधकाम विभागानेही अतिशय उत्साहाने या इमारतीचे काम पूर्ण केले.याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री.झगडे यांचा सत्कारही करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशीच्या दिवाणी न्यायाधीश जे.एस गायकवाड आणि ॲड.एस.एम कुलकर्णी यांनी केले आणि कळंब विधीज्ञ मंडळाचे सचिव प्रविण यादव यांनी आभार मानले. 

 
Top