धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र वैश्विक, धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने वास्तुविशारद सल्लागारानी पहिल्या टप्प्यात रु.1000 कोटीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. जेष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रारूप आराखड्यावर चर्चा झाली. 

 आगामी पाच वर्षात आई भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तिप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याअनुषंगाने पायाभूत सुविधांसह भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. या सर्व बाबींचा विचार करून विकास आरखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या सहकार्याने स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी  पहिल्या टप्प्यातील रु.1000 कोटीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. यामध्ये ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना नियोजित वेळेत दर्शन घेता येणार असून त्यांना थांबण्यासाठी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त दोन प्रतिक्षालये बांधण्यात येणार आहेत. यामध्ये दुकाने, शौचालये, टी.व्ही.स्क्रीन, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स अशा सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष प्रवेश ठिकाणी या व्यतिरिक्त दर्शन मंडप प्रस्तावित करण्यात आले असून यामध्ये मोबाईल व पादत्राणे ठेवण्याची सुविधा राहणार आहेत. येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी चढउतार करण्यास सोयीस्कर असलेला 750 मिटरचा लांबीचा ‘रॅम्प’ उभारण्यात येणार असून यामध्ये आपत्कालीन मार्ग व दोन लिफ्ट समाविष्ट आहेत . 10000 भाविक क्षमतेचा भव्य दर्शन मंडप प्रस्तावित करण्यात आला आहे. 

 10 एकर जागेमध्ये आई भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे शिल्प व वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या पूर्ण जागेमध्ये बागबगीचा व ‘ लाइट अॅन्ड साऊन्ड शो ‘ विकसित करून आकर्षक  सौदर्यीकरण  करण्यात येणार आहे.  शहराला जोडणाऱ्या चार प्रमुख रस्त्यांवर भव्य दिव्य कमानी उभारण्यात येणार असून मंदिराकडे येणाऱ्या प्रमुख तीन रस्त्यावर देखील कमानी प्रस्तावित केल्या आहेत.  

     जेजूरी देवस्थानच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील रु.1000 कोटीचा विकास आराखडा अंतीम करून परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभागा कडे सादर करण्याचे ठरले आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारसह सीएसआर च्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न राहणार आहेत.     सदरील बैठकीस राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, स्ट्रक्टवेल चे संचालक  चेतन  रायकर आदी उपस्थित होते.

 

 
Top