कळंब/ प्रतिनिधी-

 साहित्य हे समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाची भुमिका बजावत असते, साहित्य आपली अस्मिता आणि आत्मभान चिरंतन तेवत ठेवत असते. त्यामुळे साहित्यिकांच्या लेखणीतील नायकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिर्माणाची चळवळ सांगितली पाहिजे. असे प्रतिपादन विचारवंत, साहित्यिक प्रा. डॉ. सिध्दोधन कांबळे यांनी व्यक्त केले. कळंब येथे झालेल्या 'जीवनयात्री: एक संघर्षगाथा' या स्मृती ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

येथिल ज्येष्ठ साहित्यिक स्मृतिशेष एफ. एन. कसबे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजीत प्रकाशन सोहळ्यात ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची प्रभावी मांडणी आजच्या साहित्यातून झालेली दिसून येत नाही. त्यामुळे तरुण साहित्यिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्कालीन भूमिकांचे अभ्यासपूर्ण चिंतन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिर्माणाची चळवळ सांगितली पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे हे होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी आत्मभान, प्रेरणा आणि ऊर्जित अवस्था देण्यासाठी साहित्यिकांनी नवनवे प्रयोग आपल्या साहित्यातून करावेत असे सांगितले.

या यावेळी मंचावर प्रा.डॉ. सारिपुत्र तुपेरे, प्रा. डॉ. बाळासाहेब मागाडे, पंडित कांबळे, के.व्ही. सरवदे, रमेश बोर्डेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघरत्न कसबे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद खांडके यांनी केले. 

यावेळी कार्यक्रमास कळंब शहरातील अनेक साहित्य रसिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, राजरत्न कसबे, आनंद कसबे, प्रा. अनिल कांबळे, बालाजी गायकवाड, रतन उबाळे, डी. डी. गायकवाड, राजपाल गायकवाड, तुषार रणदिवे इत्यादींनी परिश्रम घेतले.


 
Top