धाराशिव / प्रतिनिधी-

 जोवर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तोवर अदानी आणि त्यांच्यासारख्या भांडवलदारांना सुखाचे दिवस आहेत. ही भांडवलशाही आणि पुरोहितशाही जोवर जीवंत आहे, तोवर लोकशाही विकसित होणार नाही. पुरोहितशाही आणि भांडवलशाही समृध्द लोकशाहीसमोरील सर्वात मोठे संकट असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत. पुरोहितशाही गाढून टाकण्यात आपण यशस्वी झालो. पण भांडवलशाहीचे काय? असा प्रश्न डॉ. रावसाहेब कसबे यांनी उपस्थित केला.

येथील क्रांती चौकात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप कसबे यांच्या व्याख्यानाने झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुक्तचिंतन या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख तर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. झरे, विशाल शिंगाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, नितीन बागल, सुनील बनसोडे, तुषार वाघमारे, अरूण बनसोडे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

भांडवलशाहीने प्रत्येकवेळी आपले रूप बदलून लोकशाहीला विळखा घालण्याचे काम केले आहे. सध्याच्या काळात भांडवलशाही कमजोर होवू पाहत आहे. कारण तिचे रूप बदलण्याचे सामर्थ्य आता नाहीसे होऊ लागले आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक मंदीच्या रूपाने त्याचे दुष्परिणाम हळुहळू जाणवू लागले आहे. या दुष्परिणामांच्या संकटातून देशाला सावरण्यासाठी समाजवादी मुल्यांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचेही डॉ. कसबे यांनी यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले. डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी तथागत गौतम बुध्द, संत कबीर आणि ज्योतिबा फुलेंचे विचार आचरणात आणतात का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संत कबीरांनी माणसांवर प्रेम करायला शिकविले. भांडवलशाही स्पर्धा करायला लावते. प्रेम हा लोकशाहीचा गाभा आहे आणि भांडवलशाही लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचे काम करते. आपल्या लोकशाहीला बाबासाहेबांचे गुरू असलेल्या संत कबीरांच्या व्यापक प्रेमाची आज आवश्यकता असल्याचेही कसबे यांनी यावेळी नमुद केले. नरेंद्र मोदी हे भांडवलशाहीचे प्रतिनिधी आहेत. भांडवलशाही नव्या युगात कालबाह्य ठरत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आज ना उद्या हरणार, हे नक्की आहे. महागाईच्या झळा हिंदूंनाही बसत असताना त्यांची मातृसंघटना असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना मात्र गप्प का आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुगत सोनवणे, महेश डावरे, सत्यजित माने, बंटी शिंगाडे, अविनाश शिंगाडे, राजपाल गायकवाड, विनोद रोकडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top