धाराशिव / प्रतिनिधी-

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने मा.विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून व मा.राहुल गुप्ता,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे गुणवत्तापूर्ण शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यासाठी काल जिल्हास्तरीय  परिक्षा  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद याठिकाणी संपन्न झाली. ही परिक्षा जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. जिल्हास्तरीय परिक्षा १०० गुणांची होती. ७५ गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न व २५ गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा होती. याअगोदर केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय परीक्षा संपन्न झालेली आहे. या अंतीम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील तिन असे एकूण चोवीस विद्यार्थी विज्ञान सहलीसाठी पात्र झालेले आहेत. या विद्यार्थ्यांची विमानवारी मे महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.

      उपशिक्षणाधिकारी .शिवाजी फाटक हे या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत तर केंद्रप्रमुख निलेश नागले यांनी या उपक्रमांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमीका आहे या विज्ञान सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विलास जाधव, डायट प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी (मा.) मा.गजानन सुसर  यांनी अभिनंदन केलेले आहे.


 
Top