देवळाली शाळेस स्वखर्चाने साहित्य उपलब्ध करुन दिले

धाराशिव (प्रतिनिधी) :-

शाळेत सर्वच सोयी-सुविधा असून चालत नाही, तर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये विद्यार्थी घडविण्यासाठी परिश्रम घेण्याची जिद्द असावी लागते. विद्यार्थी घडविण्याचे कार्य आपल्या शाळेतील शिक्षक करीत आहेत. या शिक्षकांच्या परिश्रमातूनच विद्यार्थी घडत आहेत, असे प्रतिपादन माजी शिक्षक भागवत तात्या देशमुख यांनी केले.

तालुक्यातील देवळाली येथील जिल्हा परिषद शाळेसाठी माजी शिक्षक व भूमीपुत्र भागवत तात्या देशमुख यांनी झेरॉक्स मशीन प्रिंटर, स्कॅनर  व पाच व्हाईट बोर्ड स्वखर्चातून उपलब्ध करुन दिले आहेत. त्या साहित्य भेटीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, केंद्रप्रमुख केदार दुधंबे, मुख्याध्यापक श्रीमती एल.एस.पवार, युवावक्ते धनंजय झोंबाडे उपस्थित होते.

पुढे बोलताना भागवत तात्या देशमुख म्हणाले की, आजचा काळ फारच गतिमान झाला आहे. पालकांनी खाजगी व महागड्या शिक्षणाची कास धरली आहे. परंतु‌ पिढ्यानपिढ्या जिल्हा परिषद शाळांनी संस्कारांची जपणूक केली आहे. गुणवत्ता, कौशल्य,  कलागुणांचा सर्वांगिण विकास करणारी प्रयोग शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेकडे पाहाणे गरजेचे आहे. आज मी शाळेला दिलेली साहित्य भेट माझे कर्तव्य आहे. कारण, मी या भूमीचा म्हणजे गावाचा भूमीपुत्र आहे. भविष्यात सुध्दा शाळेस आवश्यक ती मदत देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.

आजचा समाज दातृत्व विसरत चालला आहे. गावकऱ्यांनी मनावर घेतलं तर जिल्हा परिषद शाळांचे रुपडे बदलायला वेळ लागणार नाही. परंतु त्यासाठी इच्छा शक्ती फार महत्त्वाची असते. ती सकारात्मक इच्छा शक्ती तात्यांकडे आहे. म्हणून आजचा कार्यक्रम होत आहे. मात्र, निकोप मनाने आणि सामाजिक बांधिलकीने देण्यासाठी धडपडणारे असे तात्या गावोगावी झाले पाहिजेत, अशी अपेक्षा केंद्रप्रमुख केदार दुधंबे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे भागवत तात्या देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भागवत तात्या देशमुख यांनी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी मध्ये प्रथम येणाऱ्या मुला-मुलीस रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली. तसेच येत्या १ मे रोजी शाळेस संगणक, सीसीटीव्ही आणि इतर काही साहित्य देण्याचे घोषित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक वसंत पाटील यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागसेन शिंदे, विजय बनसोडे, प्रविण बनकर, श्रीमती एस.आर. लकापते, व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण भानवसे, विशाल चांदणे, दिगंबर माने, अमोल क्षीरसागर, युवराज पांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...म्हणून राजेश जिल्हाधिकारी झाला

आज पुणे जिल्ह्याचा यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेला राजेश‌ देशमुख हा माझा मुलगा आहे. विशेष म्हणजे तो याच गावचा सुपुत्र आणि याच शाळेचा विद्यार्थी आहे. तोही तुमचा सारखा बसून कार्यक्रम बघत आणि ऐकत मोठा झाला. पंरतु त्याने जिद्द, मेहनत आणि चिकाटी सोडली नाही. त्यामुळे तो जिल्हाधिकारी होऊ शकला. म्हणून तुम्ही सुद्धा खूप अभ्यास करा. मेहनत घ्या. परिश्रम करा. मोठी स्वप्ने बघा. पण, ती स्वप्ने सत्यात आणण्याची जिद्द बाळगा, असा मौलिक सल्लाही भागवत तात्या देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

 
Top