रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी गत महामंडळाची

 धाराशिव/ प्रतिनिधी-

  बहुतांश खिडक्यांना काचा नसलेली, पत्रे उचकटलेली एसटी महामंडळाच्या भूम आगाची बस सलग तिसर्या दिवशी विधानसभेत गाजली. या रुपाने एसटी महामंडळाचा संवेदनाहीन कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी गत महामंडळाची झाल्याचे बोलले जात आहे. 

भूम आगाराची भंगार अवस्था असलेली बस (एमएच २० बीएल ०२०६ ) प्रवाशांच्या सेवेत दाखल होती. विशेष म्हणजे या बसवर राज्य सरकारच्या निर्णयांची जाहिरात करण्यात आली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा व 'वर्तमान साकार, भविष्यास आकार योजना दमदार, गतिमान सरकार' आणि 'निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान' अशी जाहिरात रंगविली होती. या जाहिरातीशी नेमकी विसंगत स्थिती वसची होती. चालकाच्या बाजूने अगदी शेवटपर्यंत केवळ एकच खिड़की सुस्थितीत होती. तर उर्वरीत सर्व खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. अनेक ठिकाणी या बसचे पत्रेही उचकटलेले होते. या बसचे रुप सरकारच्या जाहिरातीच्या विसंगत असल्याचे सांगत भूम येथील नागरिक फैजन काझी यांनी या बसचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यानंतर हे इतके व्हायरल झाले की पार अर्थसंकल्पीत अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहातच यावर भाष्य करीत सरकारचे वाभाडे काढले.

सोबतीला बसचा फोटोही शेअर केला. या प्रकाराने एसटी महामंडळ कमालीचे हादरुन गेले. तातडीने सुत्रे फिरली. महामंडळाने कारवाई करीत डी. बी. एडके, एस. एन. हराळ व ए. यु. शेख या तीन वाहन परिक्षकांना निलंबीत केले. ही बाब  समजल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा या निलंबनाचा विषय छेडून एसटी महामंडळ व परिवहन विभागाला फैलावर घेतले. दोष सरकार व महामंडळाचा असताना कर्मचार्यांवर कारवाई का, अशी विचारणा करीत या कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली.

 
Top