धाराशिव / प्रतिनिधी-

 चवदार तळ्याचे पाणी पिल्यामुळे आपण अमर होणार नाहीत. पण जनावरांना जे पाणी चालते, त्या पाण्यावर माणूस म्हणून आमचा हक्क नसावा ही शोकांतिका आहे. मानवी हक्कासाठी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करणे आपली जबाबदारी आहे, अशा शब्दात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकार्‍यांना आवाहन केले आणि तो ऐतिहासिक सत्याग्रह मानवी हक्कांचा दीपस्तंभ म्हणून आपल्यासमोर साकारला गेला असल्याचे मत प्रा. सुरेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित व्याख्यानमालेचे दुसरेे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सुदेश माळाळे हे होते.  यावेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, रवी माळाळे, विनय पाटील, अरूण बनसोडे, सुनील बनसोडे, अशोक लोंढे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. सुरेश वाघमारे म्हणाले की, मानवी इतिहासातील महत्वपूर्ण घटना म्हणून महाडच्या सत्याग्रहाकडे पाहिले जाते. माणसांच्या मुलभूत अधिकारांचे हनन होवू नये. इतरांप्रमाणे त्यांच्या नैसर्गिक जगण्याचा दर्जा राखला जावा, या मुल्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने संघर्षशील भूमिका घेतली. महाडचा सत्याग्रह त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. महाडच्या सत्याग्रहामुळे पिचलेल्या, दबलेल्या शोषितांच्या मनगटात बळ आले. आपल्या हक्कांची आणि अधिकारांची त्यांना जाणीव झाली. फे्ंरच राज्यक्रांतीमधून निर्माण झालेल्या मुलभूत अधिकार आणि हक्कांचा समतावादी उजेड, पेरण्याचे काम महाडच्या सत्याग्रहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या सत्याग्रहात सहभागी झालेल्या तीन हजार 840 आंदोलनकर्त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या आनंदाने या सर्वांनी हा तुरूंगवास भोगला.

महामानवाचे अनुयायीच त्यांच्या विचाराचा अनेकदा पराभव करतात. त्यामुळे महामानवाच्या नैसर्गिक मृत्यूपेक्षा त्यांच्या विचारांचा मृत्यू हा देशासाठी सर्वात घातक असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जगभरातील अनेक देशांनी मोठ्या सन्मानाने स्वीकारला आहे. त्यात सामान्य माणसांच्या दुःखाची, संकटाची मालिका उधळून लावण्याची धमक आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी घालून दिलेल्या नैतिक मुल्यांचा अंगीकार, हेच त्यांना मोठे अभिवादन असेल, असेही वाघमारे यांनी सांगितले.

प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी तर अध्यक्षीय समारोप अ‍ॅॅड. सुदेश माळाळे यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुगत सोनवणे, महेश डावरे, सत्यजित माने, बंटी शिंगाडे, अविनाश शिंगाडे, राजपाल गायकवाड, विनोद रोकडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top