धाराशिव / प्रतिनिधी - 

२०२२ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे, हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ढोकी येथे दि.११ मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून त्या शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रकार केल्यामुळे अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.
धाराशिव तालुक्यातील ढोकी साखर कारखाना चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. 
 जिल्ह्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटामध्ये मागील दोन वषार्पासून अडचणीत आला आहे. शासनाला वेळोवेळी केलेल्या मागण्यांसदर्भात कसलीही ठोस कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत २२ हजार क्विंटन हरभरा व्यापाऱ्यांना विकलेला आहे. मात्र शासनाने अद्यापपर्यंत हमी भावाने खरेदी करण्यासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शासनाने ३० हरभरा खरेदी केंद्र त्वरीत मंजूर करुन चालू करावीत. हरभरा खरेदी करताना शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १५ क्विंटल हरभरा उत्पादकता जाहीर करावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती किलो १ रुपया दर मिळत आहे. तर शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही. तसेच खत, काढणी, कापणी, बारदाना व आडतीपर्यंत वाहनाने घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला १ हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान मंजूर करुन हमीभाव खरेदी केंद्र त्वरीत चालु करावीत. तसेच २०२२ चा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट देण्यात यावा. २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसान भरपाईचे २२२ कोटी रुपये त्वरीत शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. तर टेंभूर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरण मंजूर करुन त्याचे काम त्वरीत चालु करावे. तसेच कळंब तालुक्यातील येडेश्वरीची जत्रा असून या यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविक दाखल होतात. मात्र येडेश्वरी मंदीर ते बार्शी रोड ३.५ कि.मी. अंतराचा रस्ता पूर्णपणे उघडला असून मोठमोठाले खड्डे पडले असल्याने देवी दर्शनासाठी भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करुन त्याचे काम त्वरीत चालु करण्यात यावे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अत्यावश्यक असलेल्या विजेचे प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढ रद्द करण्यात यावे. तर शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेली सक्तीची वीज बिल वसूली तात्काळ थांबविण्यात यावी. विशेष म्हणजे खास शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर करुन मृत शेतकरी कुटूंबियांच्या वारसांना विमा रक्कम तातडीने वाटप करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 
 
Top