धाराशिव / प्रतिनिधी - 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आणली. त्यामुळे मराठवाड्यातील बहुजन समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास झाला असे मत प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी व्यक्त केले. 

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय , उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी'डॉ बापूजी साळुंखे आणि मराठवाडा' या विषयावर दुसरे पुष्प गुंफले श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम, ता.करमाळा , जि. सोलापूर येथील प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्याख्यानमाला संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सुशीलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.प्रकाश कांबळे हे होते.

 या व्याख्यानमालेच्या दुसऱ्यात पुष्पात प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी परमपूज्य शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे १९५७-५८ या काळातील मराठवाड्यातील आगमन, मराठवाड्यातील तत्कालीन शैक्षणिक- सामाजिक परिस्थिती यांचा आढावा घेतला. उस्मानाबाद , काजळा, कामेगाव, तुळजापूर, नळदुर्ग, बीड, पाचंग्री, बंकलगी, सोलापूर, लऊळ , निमगाव (टे) , केम, केतुर-पारेवाडी या ठिकाणी बापूजींनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या विविध शैक्षणिक केंद्रांची स्थापना, त्या काळातील ग्रामस्थांची मदत व त्या काळातील तत्कालीन सामाजिक , आर्थिक परिस्थिती यावर आपल्या ओघवत्या शैलीत प्रकाश टाकला. 

 यावेळी श्रीमती सुशीलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.प्रकाश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाड्यातील योगदान आणि बापूजींचे शैक्षणिक कार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समन्वयक प्रा. राजा जगताप यांची उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.शिवाजीराव गायकवाड यांनी मानले.     सदर कार्यक्रमासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top