धाराशिव / प्रतिनिधी-

हरभरा, कांदा खरेदी असो की धाराशिव शहरातील उद्यान, आठवडी बाजार विकास कामाना स्थगिती देम्याचा निर्णय असो याविषयी आमदार कैलास घाडगे पाटील यानी सरकारविरोधात विधानसभा सभागृहात आक्रमक भुमिका घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच सामान्य नागरीकांच्या मुलभुत समस्येबाबत हे सरकार गंभीर नसल्याचे त्यानी म्हटले आहे.  

हरभरा खरेदी केंद्र मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासुन ४४ केंद्रावर चालु होती परंतु यावर्षी फक्त २२ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली. अदयाप त्याची खरेदी  चालु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना माल खुल्या बाजारात विक्री करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ज्या केंद्रानी हरभरा खरेदीसाठी मागणी केली आहे त्या सर्व केंद्रांना मंजुरी करण्याची मागणी यावेळी आमदार घाडगे पाटील यानी केली. तसाच प्रकार कांद्याच्या खरेदीबाबत झाला आता अनुदानाची घोषणा केली असली तरी त्यामध्ये फक्त आपल्या राज्यात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. पण जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा हैद्राबाद, बेंगलोर व इतर राज्यामध्ये विक्री करतो अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे अशीही भुमिका आमदार घाडगे पाटील यानी घेतली. धाराशिव शहरात महाविकास आघाडी सरकारकडुन उद्यानासाठी व आठवडी बाजारासाठी निधी मंजुर करुन आणला होता. परंतु नविन सरकारने निधी मंजुर असलल्या कामांनाही स्थगीती दिली आहे. शहरात एकही उद्यान नसल्याने ही स्थगीती तात्काळ उठवण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. १५ वा वित्त आयोगाचा निधी एक वर्षापासुन नगर परिषदांना वितरत केलेला नाही. त्यामुळे लाईट बिल इतर सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिकांना अडचणी येत आहेत, हा निधी तात्काळ देण्याची मागणी त्यानी यावेळी केली. कळंब नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता असुन तलाव  व खेळासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी नगर विकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देऊन त्या जागेवरील आरक्षण उठवण्याची व प्रस्ताव मंजुर करण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यानी केली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान देते मात्र एप्रिल २०२२ पासुन केंद्र सरकारने तांत्रीक अडचणीमुळे अनुदान दिले नाही. त्यामुळे वयोवृध्द व्यक्तींना वृध्दापकाळात मिळणारे अनुदान मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आग्रही मागणी आमदार पाटील यानी सभागृहात केली. शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ३० नोंव्हेंबर २०२२ सहकार विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जदार सभासद यांना  व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करुन कर्जदार शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्याची मागणीही आमदार घाडगे पाटील यानी लाऊन धरली.

 
Top