धाराशिव / प्रतिनिधी-

 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२वी) साठी प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २०.१२.२०१८ नुसार सन २०२२-२३ या वर्षात, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ. १० वी) साठी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत १) १४ / १६/१७ वर्षांखालील गटात म्हणजे इ. ६ वी पासून इ. १० वी पर्यंत केव्हाही जिल्हा/ विभाग/ राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इ. १० वी ) मध्ये परिशिष्ट ६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात येतील. क्रीडा प्रमाणपत्रावर विद्यार्थी कितव्या इयत्तेत असताना खेळला त्या इयत्तेचा उल्लेख असावा.(२) तथापि इयत्ता १० वी पूर्वी विद्यार्थ्यांने प्राविण्य मिळविलेले असले तरी, सवलतीचे गुण मिळण्याकरिता त्या विद्यार्थ्यांने इ. १० वी मध्ये क्रिडा प्रकारामध्ये सहभागी होणे आवश्यक राहील.(३) १८/१९ वर्षाखालील गटात म्हणजे इ. ६ वी पासून इ. १२ वी पर्यंत केव्हाही जिल्हा / विभाग / राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांस उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इ.१२ वी ) मध्ये परिशिष्ट ६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात येतील. क्रीडा प्रमाणपत्रावर विद्यार्थी कितव्या इयत्तेत असताना खेळला त्या इयत्तेचा उल्लेख असावा.(४) तथापि इयत्ता १२ वी पूर्वी विद्यार्थ्यांने प्राविण्य मिळविलेले असेल तरी त्या विद्यार्थ्याने इ. १२ वी मध्ये क्रिडा प्रकारामध्ये सहभागी होणे आवश्यक राहील. (या खेळाडू विद्यार्थ्यांने इ. ६ वी ते इ. १० वी या कालावधीत प्राविण्य मिळविलेले असेल व याकरिता असलेले सवलतीचे गुणांचा लाभ एकदा घेतला असेल तर त्याला पुन्हा इ. १२ वी करीता याचा लाभ घेता येणार नाही तथापि या खेळाडू विद्यार्थ्याने इ. ११ वी व इ. १२ वी मध्ये प्राविण्य / सहभाग घेतला असेल तर त्याला परिशिष्ट ६ प्रमाणे गुण अनुज्ञेय आहेत.

 तरी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक,प्राचार्य, क्रीडा शिक्षक, यांनी आपल्या विद्यालय / महाविद्यालयाने  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने व एकविध खेळ संघटनेद्वारे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी व प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंच्या वाढीव गुणाचे प्रस्ताव या कार्यालयाकडे दिनांक ३० मार्च २०२३ पर्यत कार्यालयीन वेळेत (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे विहीत नमुन्यात प्रपत्रामध्ये) सादर करावेत असे आवाहन श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, धाराशिव  यांनी केले आहे.


 
Top