धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आज देखील महाराष्ट्राची याच वाटेने कारकीर्द सुरु आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यामध्ये विद्यापीठ निर्माण करून मोलाचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन प्रा. डी.एम. शिंदे यांनी दि.१२ मार्च रोजी केले. 

धाराशिव  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राच्या सभागृहात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्रा. डॉ. बालाजी गुंड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रमेश दाबके, सदस्य सुरेखा जगदाळे, सचिव बालाजी तांबे, प्रा. घोडके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा शिंदे म्हणाले की, उस्मानाबाद येथील महाविद्यालयात २ हजारांच्या पुढे विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तर कॉपीमुक्त अभ्यासक्रम सुरु झाल्यापासून या केंद्रास दोन वेळा पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम केले असून उच्च शिक्षण गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्यावेळी बुर्का पद्धती होती त्यावेळी महिला शिक्षणापासून दूर व वंचित राहत होत्या. या अडचणी लक्षात घेऊन व त्यासाठी उपाय योजना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगतीसाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाची परिस्थिती काय आहे ? हे आपण पाहत आहोत. तसेच त्यांना सामाजिक क्षेत्रासह साहित्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आवड असल्यामुळे त्यांनी २५ लाख रुपये साहित्य संमेलनासाठी अनुदानाची तरतूद केली. त्याबरोबरच प्रगतीसाठी उद्योग आणि शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती त्याकाळी १९५८ साली औरंगाबाद येथे विद्यापीठाची स्थापना केली. त्या काळात दूरदृष्टीचा विचार करून हे विद्यापीठ स्थापन केल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचन व पुस्तकाचे वाचन करून महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव गिले यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा डॉ रुपेश जावळे यांनी मानले. केंद सहाय्यक ज्ञानेश्वर बारवकर ,  प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


 
Top