तुळजापूर/प्रतिनिधी-

 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

 याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ रमेश दापके ,माजी प्राचार्य रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद यांनी वरील प्रतिपादन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गिताने करण्यात आली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ दापके पुढे म्हणाले की,१८५७ साली देशात मुंबई,कलकत्ता,मद्रास हे तिन विद्यापीठ प्रथम सुरू झाली १९५८ साली औरंगाबादमध्ये मराठवाडा विद्यापीठ सुरू झाले, म्हणजे तब्बल १०१ वर्ष आपण उच्च शिक्षणासाठी बाहेरील विद्यापीठातुन उच्च शिक्षण घेत राहिलो,निजाम स्टेटमध्ये शैक्षणिक उदासिनता अधिक प्रमाणात होती.१९३८ मध्ये याच निजामस्टेट मध्ये फक्त ७० विद्यार्थ्यांनी  दहाविची परीक्षा दिली होती,याच पार्श्वभूमीवर आपल्या भागात उच्च शिक्षणाची नितांत गरज होती,आणि हीच गरज आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, परंतु आज उच्च शिक्षणामध्ये शासकीय गुंतवणूक कमी आहे, शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन ही दुय्यम दर्जाचा आहे,आज ही आपल्याकडे लोकसंख्येच्या तुलनेने उच्च शिक्षणाची टक्केवारी पाश्र्चात्य देशांच्या तुलनेत नगण्य आहे,देशात १०४३ विद्यापीठांमधुन प्रतिवर्षी ८५ लाख विद्यार्थी पदवी प्राप्त करतात,साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे ,सरासरी २९ वयवर्ष असणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्या देशात सर्वाधिक आहे म्हणजेच आपला भारत देश हा तरुणांचाच देश आहे,जग वृध्द होत आहे तर भारत देश तरुण होत आहे या तरुणांनी जीवनात यश प्राप्त होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवणे आवश्यक आहे,श्रम करणारी लोकसंख्या हीच देशहिताची लोकसंख्या असते, तरुणांनी मिळालेल्या अपयशामुळे खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रयत्नवादी रहावे असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात सज्जनराव साळुंके, सदस्य महाविद्यालयीन विकास समिती म्हणाले की,केवळ पदवी धारण करुन न थांबता तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे काळाची गरज आहे,ईच्छा असेल तरच माणूस घडतो, म्हणुनच स्वतःच्या जीवनाला उचित आकार देण्यासाठी सकारात्मक जिद्द बाळगणे गरजेचे आहे असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी केले ते म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागातील तुळजाभवानी महाविद्यालयास नॅकचे अ मानांकन प्राप्त झाले या यशामध्ये महाविद्यालयाचे माजी ,आजी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, महाविद्यालय सतत विद्यार्थी केंद्रीत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते.

सदर पदवीदान समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉ नेताजी काळे,प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा.अमोल भोयटे,प्रा बाळासाहेब कुकडे, डॉ रामा रोकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ बालाजी गुंड यांनी केले तर आभार मेजर डॉ वाय ए डोके यांनी मानले.यावेळी एकुण ७० विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top