उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील‌ हजरत खॉजा शमशोद्दीन गाझी रहे. यांच्या उर्सानिमित्त उमर फाउंडेशनच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय महिला रुग्णालयातील रुग्णांना फळे व चादरींचे वाटप दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

 कोणतीही यात्रा किंवा महापुरुषांच्या जयंती आदी कार्यक्रमाच्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठाले होर्डिंग बॅनर लावले जातात. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. तो खर्च टाळून गरजू लोकांना त्याची मदत व्हावी व त्यांच्या जीवनामध्ये सुख व आनंदाचे क्षण यावेत. खास या उद्देशासाठी उमर फाउंडेशनच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे इतर समाजसेवकांनी देखील होर्डिंग बॅनर यावर उधळपट्टी न करता गरजू लोकांना अशा पद्धतीची मदत करून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी असे उपक्रम राबवावेत, असे उमर फाउंडेशनचे अध्यक्ष इस्माईल शेख यांनी केले आहे. यावेळी रुग्णांना फळे व चादरींचे वाटप उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सपोनि कांबळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी लाकाळ, फाउंडेशनचे अध्यक्ष इस्माईल काझी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेख इरफान, मौनोद्दीन शेख, तौफीक काझी, असलम शेख, जैनोद्दीन शेख, इब्राहिम शेख, आरिफ शेख, जावेद शेख, मोहसीन शेख, आसिफ शेख, अजहर पठाण, शकील शेख, उमर फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व उमर मोहल्ला खॉंजा नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top