धाराशिव / प्रतिनिधी- धाराशिव  शहरासह जिल्हयात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग शेजारी अंतर्गत सेवा रस्ते तयार करण्यात आलेली नाहीत. सातत्याने मागणी करून ही त्याला कंत्राटदार प्रतिसाद देत नाही. प्रत्येकवेळी प्रपोजल पाठवले इतकेच उत्तर मिळत. दिशा समितीच्या याही बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांने तसेच उत्तर दिले. यावर संतापलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रपोजल कधी मंजूर होणार हे विचारल्यानंतर अिधकाऱ्याला काही न सकता आल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सात दिवसात उत्तर न दिल्यास येडशी व तामलवाडी टोल नाके बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा खासदार ओमराजे यांनी बैठकीत दिला. 

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिशा समिती सभेला २० पैकी ११ अधिकारी गैरहजर राहिल्याने खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच संतापले होते. खासदार ओमराजे यांनी अिधकाऱ्यांना फैलावर घेत सुनावले.     यावेळी खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे, समितीचे सदस्य सोमनाथ गुरव आदी उपस्थित होते. सदर बैठक शुक्रवारच्या सायंकाळपर्यंत चालली.  जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्रातुन १२ हजार १९० प्रमाणपत्रे वितरीत झाली. मात्र यासाठी ७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच एका प्रमाणपत्रासाठी ५ हजार ७४२ रूपए खर्च आला आहे. या प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर अामदार कैलास पाटील यांनी  या खर्चाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. 

कंत्राटदारांचा फायदा 

 जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून राबवलेल्या पाणीपुरवठा योजनांचा खर्च वाढवून कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी योजना राबवलेल्या गावांपासून दूर असलेल्या प्रकल्पांचा उद्भव (वॉटर सोर्स) दाखवण्याच्या प्रकाराची दिशा समितीच्या बैठकीत पोलखोल करण्यात आली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

 किणी (ता. धाराशिव) तेरणा तलावापासून २.५ किलोमीटर असतानाही तेथील योजनेसाठी ४.५ किलोमीटरवर असलेल्या उपळा येथील उद्भव दाखवला. शेकापूरसाठीही शेरकर वाडगा शिवारातील तलाव जवळ असताना दूरच्या वाघोली तलावाचा उद्भव दाखवला. विशेष म्हणजे याच तलावातून उस्मानाबादलाही पाणी पुरवठा झाला. तसेच मांडवा (ता. कळंब), काटी (सावरगाव, ता. तुळजापूर) येथे जवळ प्रकल्प असताना दुरच्या प्रकल्पांचा उद्भव दाखवला. अशा विविध गावांची यादीच आमदार पाटील यांनी सांगून योजनांचा खर्च वाढून कंत्राटदाराला फायदा करण्याचा प्रयत्न होत आहे का? असा जाब विचारला. तेव्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जून नाडगौडा यांना काहीच उत्तरे देता आली नाहीत.

 दूरचा उद्भव (वॉटर सोर्स) दाखवल्याने वीज बीलाचा भार संबंधित ग्रामपंचायतींवर पडतो, उत्पन्न नसल्याने भरमसाठ बील भरले जात नाही, यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. परिणामी कोट्यवधींची योजना असतानाही लोकांना पाणी मिळत नाही. गावागावात जलकुंभ थडगी बनून राहतात, तेव्हा याला जबाबदार कोण, असा प्रश्न खासदार राजेनिंबाळकरांनी विचारला. तेव्हा नाडगौडा केवळ पाहतच राहिले. खासदार, आमदारांनी तब्बल ५२ मिनिटे प्रश्नांच्या फैरी नाडगौडा व भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर झाडल्या. मात्र, त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही.

  गैरहजर अधिकारी 

 कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,,  जिल्हा पुरवठा अधिकारी,  जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर पालिका,  जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक),  अधिक्षक अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता महावितरण,  महाप्रबंधक दूरसंचार, महाप्रबंधक रेल्वे,  प्रकल्प संचालक हायवे नांदेड, औरंगाबाद 
Top