धाराशिव / प्रतिनिधी-

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्यावर त्याला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यामुळे अखेर शहराचे नामकरण धाराशिव झाले. यासाठी देशाच्या स्वातंत्र्यापासून नामांतर समर्थक वेगवेगळ्या स्तरावर लढा देत होते. दरम्यान, नामांतराचा निर्णय होताच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नामांतर समर्थकांनी जल्लोष केला.

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाराशिव व संभाजीनगरचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धाराशिव नामांतराचा निर्णय घेतला. यासंदर्भात पुढे प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यावर चार महिने काहीच झाले नाही. अखेर केंद्र सरकारने याला मंजूरी दिली. यामुळे धाराशिव नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारकडून याला गॅझेटमध्ये प्रसिद्धी दिल्यावर प्रशासकीय स्तरावरही सर्व दस्तांमध्ये धाराशिव नाव बदलले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने धाराशिव नामांतराला मंजूरी दिल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत झाले. ग्रामीण भागातही जल्लोष झाला. सोशल मीडियावरूनही केंद्र सरकारच्या निर्णयाच्या स्वागताच्या पोस्ट व्हायरल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराच्या तसेच दुसऱ्या गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभाराच्या पोस्ट फिरवल्या जात होत्या. मुंबईच्या उच्च न्यायालयात धाराशिव शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी धाराशिव नामांतराच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरू आहे. मात्र, अधिकृतरित्या नाव बदलण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने कोणतीही स्टे ऑर्डर न दिल्याने केंद्र सरकारने नामांतराला मंजूरी दिली आहे. याचा पुढे काय परिणाम होणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, धाराशिव नावाच्या बाजूने कोणत्याही नामांतर समर्थकाने उच्च न्यायालयात अद्याप धाव घेतलेली नाही.



 
Top