धाराशिव / प्रतिनिधी-

 रेबीज हा रोग झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून मानवास होणारा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. रेबीज हा रोग बाधित पशुची लाळ, बाधित पशुचा चावा या माध्यमांमधून प्रामुख्याने प्रसारित होतो. रेबीज हा रोग उष्ण रक्तवर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येणारा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू जनावराच्या मज्जासंस्थेस बाधा पोहोचवतात. या आजारास ग्रामिण भागात पिसाळणे असे संबोधतात . या आजाराने बाधित असलेला श्वान हा प्रामुख्याने जनावराच्या मागील बाजूस मांडी वर, तसेच काही वेळा नाकपुडी, तसेच गळ्यावरील मांसल भागास चावा घेतो जेणेकरून या भागात मज्जा संस्थेचे दाटजाळे असते अशा भागातील स्त्रावातुन हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात.

 ज्या पशुपालकांना त्यांच्या पशुधनास श्वानदंश झाल्याचा संशय आहे, तसेच पिसाळलेल्या भटक्या श्वानांचा त्यांच्या परिसरात, जनावरांचा गोठा तसेच पशुधनाच्या आसपास फिरल्याचे निदर्शनास आलेले आहे अशा पशुधनासाठी श्वानदंशानंतर करावयाच्या लसीकरण पद्धतीने उपाययोजना करण्यात यावी. तसेच अशा परिसरातील इतर पशुधनांना श्वानदंशापुर्वी करावयाच्या लसीकरण पद्धतीने उपाय योजना करण्यात यावी.

 प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले व प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधीत श्वानदंश झालेला असल्यास अशा पशुधनास लसीची 02 इंजेक्शन द्यावीत म्हणजेच 0 दिवस- 1 ला डोस ; 3 रा दिवस – 2 रा डोस द्यावा.

 श्वानदंश रोग निदान व घ्यावयाची काळजी

    दंश घेतलेल्या पशुधनात आक्रमकता हे लक्षण प्रामुख्याने दिसुन येते.तसेच ब-याच वेळा गव्हाण,झाडाचा बुंधा यावर धडक देणे, चावण्याचा प्रयत्न करणे किंवा चावा घेणे, पाण्यास घाबरणे,अंधाराकडे ओढ घेणे अशा प्रकारची लक्षणे आढळुन येतात.संशयास्पद, आजारी पशुधनाबाबत श्वानदंश झाल्याचा किंवा परिसरात पिसाळलेला, भटका कुत्रा दिसून आल्याचा पूर्व इतिहास असावा, आपल्या कडीलपशुधनात रेबीज झाल्याचा संशय बळावत असेल तर अशा पशुधनास हाताळू नये. अशा बाधित पशुधनास उपचार करणे निरुपयोगी ठरते. अशा बाधित पशुचा शिल्लक राहिलेला चारा इतर पशुंना टाकु नये तसेच पिण्याचे पाणी, भांडी, शेड व परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी करबोलिक ॲसिड, सोप सोल्युशन अथवा डिटर्जंटच्या द्रावणाचा वापर करावा. बाधित पशुधनाने दंश केल्यास किंवा त्याचे लाळेची संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जनाच्या द्रावणाने जखम धुवून काढावी तसेच जखमेवर दोन टक्के ॲक्वियस क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड लावावे त्यानंतर त्यावर आयोडीन,पोव्हिडीन आयोडीन लावावे. जखमेस पट्टी बांधू नये तसेच बाधित जनावराची लाळ नमुना तपासणीचे निष्कर्ष नकारार्थी आढळल्यास संशयित पशुधनास रेबीज रोग झालेला नाही असे अनुमान काढणे संयुक्तिक राहत नाही.

  त्याचप्रमाणे बाधित पशुधन मृत झाल्यास त्याचे शवविच्छेदन करीत असताना व्यक्तिगत जैव सुरक्षा साधने जसे की पीपीई किट वापरावी. मृत पशुचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही तसेच मृत पशुधनाच्या संपर्कात येऊन इतर जनावरे या आजाराने बाधित होणार नाहीत.

 उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचा उपयोग करून श्वानदंश रोगाच्या बाबतीत उपाय योजना कराव्यात तसेच उपरोक्त प्रकारची परिस्थिती उदभवल्यास नजीकच्या पशु वैदयकीय संस्थेस संपर्क साधावा असे आव्हान पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी यांनी केले आहे.


 
Top