धाराशिव / प्रतिनिधी-

राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे माजी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली आहे.

 माजी राज्यमंत्री कडू हे सोमवारी (दि.27) धाराशिव येथे आले असता महाराष्ट्र राज्य तुळजाभवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रात साखर उद्योग हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. आजमितीला राज्यात दोनशेपेक्षा जास्त साखर कारखाने कार्यरत असून यामध्ये पंधरा लाखापेक्षा जास्त ऊसतोड कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना अद्याप त्यांच्या हक्काचे काहीच मिळाले नाही. साखर उद्योगामध्ये ऊसतोड कामगारांचा मोठा वाटा असला तरी त्यांचे जीवनमान हलाखीचे व अस्थिर झालेले आहे. या कामगारांकडे उत्पन्नाचे इतर साधन नसल्याने ऊसतोड हाच आधार आहे. त्यांना मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने ते हलाखीचे जीवन जगत आहेत. कुटुंबातील मुले-मुलीही याच व्यवसायाकडे वळत असल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडख, कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह,ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, कामगारांना योजना पुरविण्यासाठी कारखान्यात प्रतिवर्षी गाळपाच्या प्रतिटनाप्रमाणे 10 रुपये सेस निधी महामंडळाकडे जमा करणे व तेवढीच रक्कम शासनामार्फत जमा करण्याबाबत असे वेगवेगळे शासननिर्णय जारी झाले तरी देखील ऊसतोड कामगारांच्या जीवनात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करुन राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top