उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना काळाचा विद्यार्थी, व्यापारी, खाजगी क्षेत्रातील नोकरवर्गावर मोठा परिणाम झाला. अध्यापनातील व्यत्ययामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊन ते नैराश्यात गेले. व्यवसाय चालत नसल्यामुळे व्यापारी, उद्योजकही अडचणीत आले. त्यामुळे अनेकजणांच्या जीवनात ताणतणावाने जागा घेतली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे असून हीच कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत प्रेरक वक्ते अर्शद रशीद सय्यद यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रेरक वक्ते अर्शद सय्यद यांच्या वतीने विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, नोकरदार वर्गासाठी खुली कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगदे, प्रा.डॉ. रशीद सय्यद,  मसूद शेख, इलियास पीरजादे, बाबा मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे बोलताना सय्यद म्हणाले की,  आज कोणत्याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा पहावयास मिळत आहे. या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व निर्माण करताना आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्पर्धेला सामोरे जाताना मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. व्यक्तीमत्व विकासाचे देखील तुमच्या यशामध्ये महत्वाचे स्थान आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच करिअर कसे निवडावे, व्यक्तीमत्व विकास, परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी यासह अनेक विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

 जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले .

सुत्रसंचालन प्रा.डॉ. उकिरडे यांनी केले. कार्यक्रमाला उस्मानाबाद शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अकबर पठाण, अथर खान, जफर पठाण, इरफान तांबोळी, सुलतान मशायक, डॉ. नोमान, अमर सोनटक्के, अमन पठाण, जुबेर पठाण, अब्दुलरहेमान रजवी, फैजान खोड़िल, इसाक शेख, यांनी परिश्रम घेतले.


 
Top