उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्र. 652 साठी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, वागदरी, गुजनूर, शहापूर, गुळहळ्ळी, निलेगाव शिवारातील शेतकर्‍यांच्या जमिनींची संयुक्त फेरमोजणीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाप्रमाणे बाधित क्षेत्राचा मावेजा व्याजासह देण्यात यावा. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकर्‍यांच्या कुटुंबीयासह 8 फेब्रुवारी रोजी  उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग, वागदरी, गुजनूर, शहापूर, गुळहळ्ळी, निलेगाव शिवारातील शेतकर्‍यांच्या जमिनीची संयुक्त भूसंपादन मोजणी व फेर संयुक्त मोजणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार 5 मे 2022 ते 30 जून 2022 पर्यत प्रत्यक्ष उपस्थित राहून  व शेतकर्‍यांना रीतसर नोटिसा देऊन तुळजापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील भूमापकानी मोजणी करुन भूसंपादन अकिारी तथा उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांना सादर केला. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर दिलेल्या अंतिम निकालाप्रमाणे शेतकर्‍यांच्या बाधित क्षेत्राचे लवकरात लवकर संपादन करुन त्याचा मावेजा प्रचलित कायदा व नियमानुसार व्याजासह देण्यात यावे या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

परंतु भूसंपादन अधिकारी कार्यालयाचे राजकुमार माने यांनी कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचना न देता शेतकर्‍यांच्या मालकी हक्काच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने मोजणी करुन बळकावण्याचा प्रयत्न करुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांनी केला आहे. तसेच 12/01/2022 रोजी गावकामगार तलाठ्यामार्फत करण्यात आलेली बेकायदेशीर मोजणी ग्राह्य धरु नये, व संबंधित प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा आणणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन  करणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे  कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांनी म्हटले आहे.

 
Top