नळदुर्ग / प्रतिनिधी- 

 शिवराय मनामनात--शिवजयंती घराघरात हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सोलापुर येथील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने ऐतिहासिक नळदुर्ग शहरात १०१ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन हा कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आला आहे.

 युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांनी नळदुर्ग येथे गेल्या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुढच्या वर्षी नळदुर्ग शहरामध्ये घराघरात शिवजयंती साजरी व्हावी यासाठी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने १०१ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची पुर्तता करून कफील मौलवी यांनी नळदुर्गवासीयांना दिलेला शब्द पाळला आहे.

  हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात हा संकल्प घेऊन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने या वर्षी नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १०१ पुतळे (घरगुती पुजेसाठी) वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ फेब्रुवारी रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन खा. ओमराजे निंबाळकर, राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार ज्ञानराज चौगुले, लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, राजेंद्र मिरगणे हे उपस्थित राहणार आहेत तर भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शहाजी पवार, उद्योगपती दत्तात्रय मुळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अनिल गोटे, तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य ऍड. अनिल काळे, सोलापुर येथील गड संवर्धन समितीचे आनंद देशपांडे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शफीभाई शेख, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

       यावेळी सोलापुर प्रसिध्द इतिहासकार व व्याख्याते शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करकमकर, श्रीमती वैशालीताई जैन व माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी यांनी केले आहे.


 
Top