उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गट-तट ,कलर यावरून समाजात विभागणी झाली आहे, त्यामुळे प्रत्येक समाजाचे प्रश्न जैसे थे आहे. प्रश्न सोडविण्यासाठी आपण कमी पडतो, त्यासाठी समाजाने गट-तट व रंगामध्ये न अडकता एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवून घ्यावेत, असे मत इंदौर  संस्थानच्या होळकर घराण्याचे तेरावे वंशज राजेभुषणसिंह होळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत डोलारे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी उपस्थित होते. पुढे बोलताना होळकर म्हणाले की, महापुरूषांचा इतिहास नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. मात्र वाचनाकडे अनेकांनी पाठ फिरवलेली असल्यामुळे आधुनिकतेच्या युगात सिनेमा या माध्यमातुन तो मांडला जात आहे. परंतू या सिनेमाद्वारे  महापुरूषांचा विडंबनात्मक इतिहास मांडुन व्यापारीकरण केले जात आहे. समाजाची दिशाभुल करण्याचे प्रमाण सिनेदिग्दर्शकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी महापुरूषांच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढण्यासाठी स्वतंत्र सेन्साॅर बोर्ड काढण्याची मागणी केली आहे. त्यास माझा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे छत्रपती घराणे व होळकर घराणे वेगळे आहे, असा जो गैरसमज आहे, तो चुकीचा असून त्या दोन्ही घराण्याचे पुर्वीपासून िजव्हाळा असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

   विशेष म्हणजे अहिल्याबाई होळकर या लढवय्या, धार्मिक व प्रशासक देखील  होत्या. त्यामुळे त्यांचा तो इतिहास समाजासमोर यावा यासाठी सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांचा आश्वासरूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मी त्या विद्यापीठातील समितीचा सदस्य असताना केली होती.  मात्र तो पुतळा अद्याप पर्यंत उभारलेला नाही, अशी खंत ही राजेभुषणसिंह होळकर यांनी व्यक्त केली.

 
Top