नळदुर्ग / प्रतिनिधी-

 मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा मुक साक्षिदार असलेल्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलास राष्ट्रीय स्मारक म्हणुन सन्मान मिळावा यासाठी, तसेच हा पुल वाचविण्यासाठी त्यावेळी  शहीद झालेले व देशातील पहिला अशोकचक्र पुरस्कार ज्यांना मिळाला ते शहीद जवान बचित्तर सिंह यांचे याठिकाणी भव्य स्मारक उभे राहावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी नळदुर्ग येथील अलियाबाद पुलास भेट दिल्यानंतर बोलताना म्हटले.

         नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाचे मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनात फार मोठे योगदान आहे. भारतीय सेना आपल्यापर्यंत पोहचु नये यासाठी निजामाने त्यावेळी हा पुल उडवुन देण्यासाठी पुलाच्या खाली दारूगोळा ठेवला होता. मात्र भारतीय सेनेतील  जवान बचित्तर सिंह यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पुल उडविण्यासाठी निजामाने ठेवलेला दारूगोळा नष्ट केला यामध्ये जवान बचित्तर सिंह गंभीर जखमी होऊन ते शहीद झाले होते. शहीद बचित्तर सिंह यांच्या शौर्याची दखल घेऊन भारत सरकारने सन १९५२ साली शहीद बचित्तर सिंह यांना अशोकचक्र पुरस्कार बहाल केला आहे. अशोक चक्र पुरस्कार मिळविणारे  जवान शहीद बचित्तर सिंह हे देशातील पहिले जवान ठरले. हा धगधगता इतिहास ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा आहे.

      केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दि.५ जानेवारी रोजी या ऐतिहासिक अलियाबाद पुलास भेट देऊन पुलाची पाहणी करण्याबरोबरच पुलाचे पुजन केले त्याचबरोबर यावेळी शहीद जवान बचित्तर सिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करून ना. अजयकुमार मिश्रा यांनी त्यांना अभिवादन केले.  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर बसस्थानकासमोरील संविधान चौकात शहर भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. मिश्रा यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक अलियाबाद पुलाजवळ झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे,संजय बताले, भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, शहर अध्यक्ष धीमाजी घुगे,शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, बंडप्पा कसेकर, माजी अध्यक्ष पद्माकर घोडके, सागर हजारे, उमेश नाईक, श्री रजवी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा सत्कार केला. यावेळी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिमा भेट देण्यात आली. भाजयुमोचे सचिन घोडके, धनगर समाजाचे सुनिल बनसोडे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा घोंगडी देऊन सत्कार केला.

     यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे मैलारपुरात जाऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले याठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खंडोबा मंदिराजवळुन गेलेल्या व गेल्या अनेक वर्षांपासुन रखडत पडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली हे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी आपण संबंधित मंत्रालयाला कळविणार असल्याचे सांगितले.      यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 
Top