तुळजापूर / प्रतिनिधी-

  ज्या मुलांना आईच्या हाताचे घट्टे आणि वडिलांच्या पायाच्या भेगा वाचता येतात, ती जाणीव ज्यांना कळते त्यांनाच आयुष्याचे पुस्तक खऱ्या अर्थाने वाचता येते. जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन व्याख्याते  रविंद्र केसकर यांनी केले. 

 ते मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूरच्या वतीने आयोजीत व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तुळजाभवानी सैनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. एस. बी. पेटकर, म.सा.प.चे अध्यक्ष अमर हंगरगेकर, कार्यवाह विजय देशमुख यांची उपस्थिती होती.

 यावेळी रविंद्र केसकर यांनी, वाचन माणसाला विचारशील आणि सुसंस्कृत बनवते. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता वाचन महत्वाचे आहे. आजवर जगात जी माणसे तत्वज्ञानी म्हणून गणली गेली ती सर्व अगोदर वाचनाने समृद्ध झाली. त्यातूनच त्यांनी जगाला ज्ञानमार्ग दाखवला.  नुसती घोकंपट्टी म्हणजे वाचन नव्हे, तर वाचलेलं किती आकलन केलं, समजून घेतलं हे महत्वाचे असते. वाचनाने विचारशीलता येते, त्यातून कृतीशील पिढीची जडणघडण होत असते, असे प्रतिपादन केले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवीचे प्रतिमापूजन करण्यात आले. म. सा. प. तुळजापूरच्या वतीने सैनिक विद्यालयास पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार सुत्रावे यांनी केले. सूत्रसंचलन  भीमा सुरवसे यांनी केले. तर अॅड. ओंकार मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानासाठी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पांचाळ सर, किरण हंगरगेकर, देवेंद्र पवार, जीवनराजे इंगळे, महेश गवळी, श्रीधर मोरे यांच्यासह म.सा.प. पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 
Top