परंडा /प्रतिनिधी -

 दिल्लीचे पीर व मुर्शद हजरत ख्वाजा निजामोद्दीन अवलिया चिश्ती रह.यांचे शिष्य हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती यांचा ७०३ वा उरूस येत्या ३१ जानेवारी रोजी होणार आहे.

         दर्ग्याचे मुतवल्ली व सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी युनूस आलम सिद्दिकी यांच्या दर्गा रोड, मुजावर गल्ली येथुन मंगळवार दि.३१ रोजी निवासस्थाना पासून सलाम फातेहा व भाविकांचे स्वागत होऊन व प्रसाद वाटप केले जाईल.त्यानंतर गणेशसिंह सद्दीवाल यांचा मानाचा घोडा सजवून तसेच मानाचा गिलाफ व चादर चढवुन मिरवणुकीने तहसील कार्यालयात जाईल तसेच मंगळवार पेठ मुजावर गल्लीतुन फुलांची चादर मिरवणुकीने येऊन तहसील कार्यालय या ठिकाणी येईल. 

       परंपरेनुसार तहसील कार्यालयात मान्यवर व भाविकांच्या उपस्थितीत सलाम फातेहा नंतर मानाची चादर व गिलाफ तहसीलदारांच्या डोक्यावर दिल्यानंतर ते मानाच्या घोड्यावर देतील. ही संदल मिरवणूक तमाम नागरिकांच्या दर्शनानंतर दर्ग्यावर जाईल.एका दमात तीस(३०) पायऱ्या चढून घोडा हजरत ख्वाजा बद्रोद्दीन यांना सलामी देईल.

 दि.३० जानेवारीला संदल माली रात्री मुजावर मंडळी संदल घासतील. कुराण पठण, नातखानी, समा व मेहफिले जिक्र नंतर गुस्ल कार्यक्रम पार पडेल.नंतर गिलाफ व फुलांच्या चादरी चढतील.

  काल चंद्रदर्शनाने उरूसाची तयारी सुरू झाली.मुतवल्ली युनूस आलम सिद्दिकी यांच्या मुख्य उपस्थितीत मुजावर बिरादरी व नागरिकांनी सलाम पेश करून फातेहा होऊन प्रसाद वाटप करण्यात आला.

उरूस कालावधी मध्ये भक्तांनी स्वच्छता, शिस्त व संयम  राखावे आणि शासन व ऊर्स कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन उरूस कमिटीतर्फे तसेच मुतवल्ली यांच्या तर्फे करण्यात येत आहे.


 
Top