नळदुर्ग / प्रतिनिधी- 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांचे हे कार्य कौतुकास्पद व समाजहिताचे आहे असे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना म्हटले.

  दि.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे जय हिंद प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकारी संचालक शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शफीभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार, शहेबाज काझी, उदय जगदाळे,कमलाकर चव्हाण, पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर,सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागिरदार, बार असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पिस्के, माजी नगरसेवक निरंजन राठोड आदीजन उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमात सलग पाचवेळा रक्तदान करणारे रक्तदाते स्वप्नील काळे, श्रमिक पोतदार, बाळु तोग्गे व अमित मोहरीर यांचा जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

       यावेळी बोलताना कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की,जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांनी जयहिंद प्रतिष्ठानच्या माध्यमातुन दरवर्षी राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात त्यांचे हे काम कौतुकास्पद व समाजहिताचे आहे असे कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे.  प्रास्तविक करताना संजय बताले यांनी म्हटले की सन २०१८ पासुन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असुन शहरातील रक्तदात्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या पाच वर्षात जयहिंद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातुन ३८० रक्ताच्या बॅग सोलापुर येथील अश्विनी ब्लड बँकेला देण्यात आले आहे. तर गेल्या वर्षभरात आम्ही गरजु ४० ते ५० रुग्णांना मोफत रक्तपिशव्या दिले आहे.

  यावेळी शफीभाई शेख व शिवाजीराव मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना जयहिंद प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री गायकवाड यांनी केले.रक्त संकलनाचे काम सोलापुर येथील अश्विनी ब्लड बँकेने केले आहे.

 
Top