उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भाई उद्धवराव पाटलांना काँग्रेस पक्षाने पक्ष बदला मुख्यमंत्री करतो असे सांगितले असताना पक्ष बदलणार नाही, लाल झेंड्यातच माझा शेवटचा श्वास जाईल असे ठणकावून सांगितले. मात्र आजचे राजकीय नेते आपली पक्षावरची निष्ठा विसरताना दिसतात. भाई उद्धवराव पाटील यांची वैचारिक ताकद मोठी होती. भाईनी  संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमावाद व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा, लोकसभा, राज्यसभा व जनमानसात सतत आक्रमक भूमीका मांडली, सध्याचा काळ राजकीय बिडी, सिडी, ईडी अशा धमकावणाऱ्यांचा आहे. अर्धमेला, पंगू व स्वाभिमान शून्य महाराष्ट्र होऊ देऊ नका. नुसती भाषणे करून भागणार नाही, सत्ताधाऱ्यांचा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करून पुन्हा वैभवशाली महाराष्ट्र उभा करावा. हीच खरी उद्धवराव पाटील यांना आदरांजली ठरेल असे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बोलताना सांगीतले.

  भाई उद्धवराव पाटील जयंती व हैद्राबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमातील जीवन गौरव पुरस्कार स्विकारताना मधुकर भावे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील हे होते. यावेळी आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे , जीवनराव गोरे, संपादक अभय दिवाण, सुरेश बिराजदार, सक्षणा सलगर, आशाताई भिसे, सुलभाताई पाटील, शशिकलाताई घोगरे, एम.डी. देशमुख, अँड .अविनाशराव देशमुख, भाई धनंजय पाटील, संभाजीराव मुंडे, पंडितराव चेडे, निर्मलाताई भांगे, श्याम घोगरे, आदित्य पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

  कार्यक्रमाची सुरुवात भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. भाई उद्धवराव पाटील यांचे सारखे नेते आता समाजात राहिले नाहीत, नव्या पिढीला असा  संघर्ष करणारा नेता असू शकतो ? हे माहीत देखील नाही. भाईंनी आयुष्यात तत्वांचे पालन केले, कष्टकऱ्यांची बाजू मांडली, आपल्या विचारावर ठाम राहिले, लोकशाही व संविधान टिकवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन भाई उद्धवराव पाटील यांच्यासारखा लढा देण्याची गरज आहे असे अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थितांना आवाहन केले.

 पत्रकार मधुकर भावे यांना यावेळी सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्कार माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  प्राचार्य पी. एन. पाटील, उपप्राचार्य एस. डी.मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे , पर्यवेक्षक एन. एम. देटे, एस, पी मुंडे आदी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य पाटील यांनी केले. जीवनगौरव सन्मान पत्राचे वाचन व्ही. के. देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य पी. एन. पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन भाई उद्धवराव पाटील विचारमंच उस्मानाबादच्या वतीने छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवी सुरवसे व अमोल दिक्षित यांनी केले.

 
Top