उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कळंब शहरात तिरट जुगारावर छापा टाकून 4 लाख 99 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी जुगार खेळणार्‍या 11 जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 29) जानेवारी रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक कळंब उपविभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 29 रोजी गस्तीवर होते. पथकास गोपनीय माहिती मिळाल्यावरून कळंब शहरातील मोहेकर कॉलेजचे पाठीमागे बोराडे यांच्या शेतातील शेडमध्ये छापा टाकला. यावेळी राहूल माने, मनोज कानडे, जलील शेख, सूरज वैरागे, ताहेर शेख, दिनेश कोलंगडे, बापू काळे, बोराडे, (सर्व रा.कळंब), अनंत कांबळे (रा. येरमाळा), विष्णु घुले (रा. टाकळी केज), सलीम शेख (रा. ढोकी), हे सर्वजण तिरट जुगार खेळत असताना पथकास आढळले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता जुगाराचा अड्डा बोराडे हे चालवित असल्याचे समजले. पोलीसांनी जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 6 मोटारसायकल, 7 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 4 लाख 99 हजार 60 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगा खेळणार्‍या व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उपविभागाचे एएसपी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकाने केली आहे.


 
Top