उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. प्रतिमाहप्रमाणे यावेळीही हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर हुतात्मा  स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद च्या निझामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला.रझाकाराच्या तावडीतून मराठवाड्यातील जनता मुक्त झाली.हा आपल्या जनतेचा लढा आजच्या युवकांसमोर यावा म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती कार्यरत आहे. यानिमित्ताने बील गेट्स महाविद्यालयात आज दि १७ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ वसुधा दिग्गज दापके देशमुख यांनी भूषविले.पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ रझवी यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी प्रास्ताविक करताना हा इतिहास पुढच्या पिढीला माहिती असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन समितीच्या वतीने जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. बुबासाहेब जाधव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक घटनांचा उल्लेख करून आजच्या युवकांसमोर हा धगधगता इतिहास मांडला.या कार्यक्रमास बुबासाहेब जाधव, डॉ वसुधा दिग्गज दापके देशमुख, अध्यक्ष युवराज नळे,प्रा अभिमान हंगरकर, सुरेश शेळके,रविंद्र शिंदे, प्रविण जगताप, राजाभाऊ कारंडे,प्रा.संतोष पोतदार, ॲड कुलदिपसिंह भोसले, प्रमोद बचाटे,प्राचार्य रझवी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top