उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रत्येक शासकीय कामकाजासह इतर सर्वच ठिकाणी आता आधार क्रमांक महत्वपूर्ण झालेला आहे. नागरिकांना मिळालेला हा युनिक आयडी आहे. या आधार क्रमांकावर अनेक कामे अवलंबून आहेत. आधार कार्डवर नागरिकांची अत्यावश्यक माहिती अपडेट असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक दहा वर्षाला आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी आधार अपडेशन केलेले नाही. आधार अपडेशन अभावी अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

 ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दर दहा वर्षांनी शरीरात होणारे बदल, नागरिकांचे होणारे स्थलांतर, वैयक्तिक माहितीमध्ये होणारे बदल, आधार सोबत लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकात झालेला बदल, पॅन कार्डसोबत लिंक करण्यात आलेला आधार क्रमांक, आधार कार्डवरील फोटो, बदल झालेला पत्ता आदी आवश्यक माहिती आधार कार्डवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा सर्व नागरिकांनी वरीलप्रमाणे आधार कार्डवरील आवश्यक माहिती अपडेट करुन घ्यावी.

 आधार कार्ड कोठे अपडेट केले जाईल?

 उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील पोस्ट कार्यालय, सीएससी केंद्र, बँक, महा ई सेवा केंद्र चालकाकडील आधार केंद्र आदी ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यात येईल.

 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 आधार कार्ड अपडेट करताना मतदान कार्ड, पॅनकार्ड, वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी पॅनकार्ड, वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 शून्य (0) ते पाच (5) वर्षाच्या मुलांचे आधार कार्ड काढणे

 शून्य (0) ते पाच (5) वर्षाच्या बालकांचे आधार काढणे आवश्यक आहे. अशा बालकांची आधार नोंदणी अंगणवाडी मध्ये किंवा हॉस्पीटलमध्ये करण्यात येते. पाच वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे.

 मुलांचे आधार कार्ड कधी अपडेट करावे ?

 मुलांचे आधार कार्ड वयाच्या पाच वर्षापूर्वी काढले असेल तर पाच वर्षानंतर अपडेट करावे लागते. त्यानंतर पाच ते पंधरा वर्ष अपडेट करण्याची आवश्यकता नाही. मात्र पंधरा वर्षानंतर पुन्हा मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. 


 
Top