उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत येथील आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 30 जानेवारी 2023 रोजी ( RUN FOR LEPROSY ) मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरॉथानसाठी 50 मुले आणि 50 मुलींनी सहभाग नोंदवला.

 सर्व प्रथम माहात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी) डॉ. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, सहाय्यक संचालक डॉ.अन्सारी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. परळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अन्सारी यांनी केले. तसेच डॉ. मुल्ला यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी यावेळी केंद्र शासनाने ठरवून दिलेले 2030 पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन समाजामध्ये दडलेले नवीन कुष्ठरुग्णांनी स्वतःहून शासकीय दवाखान्यात येवून निदान आणि उपचार करुन घ्यावेत असे अवाहन केले. सर्व शासकीय दवाखान्यात कुष्ठरोगाचे निदान व उपचार मोफत उपलब्ध आहेत. त्यासाठी समाजामध्ये दडलेले जास्तीत जास्त नवीन कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधणे आवश्यक असल्याचे सांगितले.

 प्रथम मुलींची मॅराथॉन घेण्यात आली. त्यासाठी डॉ. मुल्ला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.  दुसऱ्या फेरीमध्ये मुलांची मॅराथॉन घेण्यात आली. त्यासाठी डॉ. मिटकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.  मुलींच्या आणि मुलांच्या दोन्ही गटातून प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांची निवड करुन दोन्ही गटामध्ये प्रथम 3000 रुपये, व्दितीय 2000 रुपये, तृतीय 1500 रुपये, चतुर्थ 1000 रुपये आणि पाचवे 500 रुपये बक्षीस, ट्रॉफी आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. आर. शिंदे आणि आभार प्रदर्शन ए. व्ही. शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक, कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयी माहिती व्हावी या उद्देशाने शाळेत कुष्ठरोगाविषयी माहिती देऊन भाषण स्पर्धा घेण्यात येत आहे. तसेच आरोग्य मेळावे, त्वचारोग शिबीर, महिला मेळावे, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा आदी कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.


 
Top