उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवीत ६ लाख १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह पकडले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तो चोरी झालेला माल मूळ मालकास दि.९ डिसेंबर रोजी परत केला आहे.

 याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील गणेश नगर येथे राहत असलेल्या विद्या सतिश जेवे या कुटुंबियांसह दि.२३ सप्टेंबर रोजी राहत्या घरात झोपलेल्या असतांना रात्री ३ वाजण्याच्या सुमारास ३ अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराच्या जिन्याची जाळी कट करुन घरात प्रवेश करुन विद्यासह त्यांच्या कुटूंबियांना चाकू, गजाने धाक दाखवून कपाटातील १७० ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व ६ लाख १० रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी विद्या जेवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानाबाद (ग्रा.) पोलिस ठाण्यात गु.र.क्र. २३४ / २०२१ हा भादंसं कलम ४५७, ३८०, ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

 गुन्हा तपासात पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद (ग्रा.) पोलिस ठाण्याच्या पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक करुन लुटीतील माल जप्त करण्यात येऊन आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तो जप्त माल न्यायालयाच्या आदेशाने दि.९ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्या सतिश जेवे यांना परत देण्यात आला. याप्रसंगी उस्मानाबाद (ग्रा.) पोलिस ठाण्याचे पोनि सुरेश साबळे, सपोनि योगेश शिंदे, सपोफौ किशोर रोकडे, पोहेकॉ चौधरी, समाधान वाघमारे, बडे, पोना गणेश पाटील, पोकॉ गणेश खैरे हे उपस्थित होते. आपली मालमत्ता परत मिळाल्याने विद्या जेवे यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

 
Top