उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान तक्रार निवारण अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अॅप Android मोबाईलवर डाऊनलोड करता येते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये नागरिकांनी स्वत:ची नोंदणी करावयाची आहे. मोबाईल नंबर ओटीपी व्दारे नागरिकांची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. मे.शौर्य टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हे अॅप विकसीत करण्यात आले आहे.

  दि.15 डिसेंबर 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते या अॅपचे उदघाटन करण्यात आले. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रांजल शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 नागरिकांना तक्रार दाखल करताना तक्रारीचा थोडक्यात तपशील आणि तक्रारी संबंधित कागदपत्र (हस्तलिखीत किंवा टाईप केलेले) फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करता येतील. त्यानंतर तक्रार संबधित विभागाला पाठवता येईल. तक्रार पाठवल्यानंतर त्या तक्रारीचा युनिक नंबर तयार होईल आणि तो नंबर संबंधित नागरिकाला एसएमएस व्दारे कळवला जाईल. नागरिक तो तक्रार नंबर वापरून त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती पाहू शकतात. तसेच संबंधित विभागामार्फत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीची माहिती एसएमएस व्दारे नागरिकांना प्राप्त होतील.

 तक्रारीचे निराकारण करण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित विभागांना समाधान तक्रार निवारण अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांचे मोबाईल नंबर व ई मेल आयडी ची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिनस्त कार्यालये, अधिकारी किंवा कर्मचारी यांची नोंदणी आणि त्यात बदल करण्याची सुविधा संबंधित जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्हयातील विभाग प्रमुखांचे युजर आयडी व पासवर्ड एसएमएस आणि ई मेल व्दारे संबंधितांना पाठवण्यात आले आहेत.

 नागरिकांकडून समाधान तक्रार निवारण अॅप मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ही तक्रार संबंधित विभागाला तात्काळ प्राप्त होईल. ही तक्रार संबंधित विभागाची असल्यास त्या विभागामार्फत तक्रार निवारणाची कार्यवाही करण्यात येईल. तक्रार इतर विभागाशी संबंधित असल्यास ती संबधित विभागाला पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे निराकरण झाल्यास संबंधित विभागाने 15 दिवसांच्या आत लेखी उत्तर समाधान अॅपवर सादर केल्यानंतर तक्रार निकाली काढण्यात येईल. प्राप्त तक्रार दोन कार्यालयाशी संबंधित असल्यास आपल्या कार्यालयाची कार्यवाही करून तक्रार अंशत: निकाली हा पर्याय वापरून अॅपवर ती माहिती अपलोड करावी आणि तक्रार पुढील संबंधित कार्यालयास अग्रेषीत करावी.  निकाली काढलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांना प्रतिक्रिया देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिक समाधान किंवा असमाधान पर्याय निवडून शेरा देतील. नागरिकांच्या प्रतिक्रिया नुसार कार्यालयाची कार्यक्षमता क्रमवारी निश्चीत करण्यात येईल.

 जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या या सुविधेचा लाभ जिल्हयातील गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 
Top