चार दिवसीय अमृत महोत्सव : बंडा तात्या कराडकर, ढोक महाराजांचे कीर्तन

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार व आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप.श्री.संदिपान महाराज शिदे-पाटील हासेगांवकर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त तेर येथे आध्यात्मिक अमृत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचे आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे अभिष्टचिंतन गौरव सोहळा समितीने संत गोरोबा काका मंदिर तेर येथे दिनांक १८ ते २१ डिसेंबर दरम्यान चार दिवसीय अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे.

या अमृत महोत्सव सोहळ्यात सलग चार दिवस सकाळी कीर्तन, दुपारी प्रवचन आणि सायंकाळी हरिकीर्तन असे भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार पहाटे काकडा भजन, सकाळी विष्णुसहस्त्रनाम, अल्पोहार, कीर्तन, भोजन, विश्रांती, तीन प्रवचने, हरिपाठ, सायंकाळचे हरिकीर्तन व रात्रीचे भोजन असा दिनक्रम असणार आहे. नियोजित अमृत महोत्सव सोहळ्यात १८ रोजी सकाळी हभप.बंडा तात्या कराडकर, संध्याकाळी हभप.अर्जुन महाराज लाड गुरुजी, १९ रोजी सकाळी हभप.रामरावजी महाराज ढोक, सायंकाळी हभप.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, २० रोजी सकाळी हभप.उल्हास महाराज सुर्यवंशी, सायंकाळी हभप.संजय महाराज पाचपोर यांची कीर्तन सेवा होणार आहे. 

तर त्याच दरम्यान हभप.कान्होबा महाराज देहुकर, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप.लक्ष्मण महाराज मेंगडे, हभप.श्रीकृष्णयोगी गंजीधर महाराज, भागवताचार्य हभप.पद्मनाथ महाराज, हभप.ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भागवताचार्य हभप.प्रज्ञाचक्षु मुकुंद काका महाराज जाटदेवळेकर, हभप.रघुनाथजी महाराज आणि हभप.माणिक महाराज मुखेकर यांची प्रवचन सेवा होणार आहे. अमृत महोत्सव सोहळ्याची सांगता २१ डिसेंबर रोजी हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचा पंचाहत्तरी निमित्त यथोचित सत्कार आणि तुला होणार आहे. त्यानंतर हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. तरी या आध्यात्मिक सोहळ्याचा परिसरातल्या भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  व वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व  अभिष्टचिंतन गौरव सोहळा समितीचे प्रमुख रामकृष्ण संदिपान शिंदे-पाटील हासेगांवकर आणि विवेकानंद शिंदे यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी ९३२३२४५५५५, ८४५९४१८०८२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे कुसुमबाई संदिपान शिंदे- पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


 
Top