उस्मानाबा/ प्रतिनिधी:- मराठी  मुद्रीत साहित्य हे कधीही लोप न पावणारे आहे. जे लोक मराठी साहित्य, वाचक किंवा साहित्याला चांगले दिवस नाहीत असे म्हणतात, मला ते सद्यस्थितीला धरुन वाटत नाही, मुद्रित साहित्य अभंग आहे. परंतु काळानुरूप माध्यमांचा आकार वाढतो आहे, प्रसार माध्यमांची व्याख्या बदलेली आहे, सोशल मिडीया सारखी माध्यमे ही खूप व्यापक प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे हा काळ आव्हानात्मक असला तरी बहू माध्यम हाताळण्याचे कसब असणाऱ्यांना अधिक चांगले दिवस आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जयप्रकाश दगडे यांनी व्यक्त केले. ते आज ग्रंथोत्सव उस्मानाबाद ग्रंथालयाच्या वतीने आनंद नगर येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा ग्रंथोत्सोवात उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, विभागीय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम.डी.देशमुख, एस.एल.पवार, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण बळीराम निपाणीकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी, अनिल बावीस्कर, संतोष पवार, श्री.सोनटक्के, पत्रकार श्रीमती शिला उंबरे आदी उपस्थित होते. 

            श्री.दगडे पुढे म्हणाले की, ग्रंथ चळवळ ही मराठवाड्यात अत्यंत व्यापक असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक लोकांचा मोठा सहभाग आहे. उस्मानाबादची भूमी चळवळीला पूरक होती. देशभरातल्या किंवा जगभरातल्या चळवळी किंवा क्रांती या ग्रंथामुळे निर्माण झाल्या, त्यामुळे ग्रंथ हे नेहमीच मानवी जीवनात परिवर्तनाचा भाग राहिले आहेत. असे सांगून त्यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यांनी ग्रंथ चळवळीचा उल्लेख करताना महामानव कसे घडले याची उदाहरणे दिली. गांधी, आंबेडकर यांची उदाहरणे देऊन आजच्या काळातील साहित्य संपदा संपलेली नाही तर तरुण पिढी देखील ग्रंथ वाचन करते याची ज्वलंत उदाहरणे दिली. परवा मुंबईच्या दिक्षा भूमीवर लाखो रुपयांच्या ग्रंथाची विक्री झाली, जी की लोकांनी पुस्तके डोक्यावर घेऊन जातानाचे फोटो पाहवयास मिळाले. त्यामुळे ग्रंथ वाचन कमी झालं हे पूर्ण सत्य नाही,असेही ते म्हणाले.

       जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी धाराशिवचे ऐतिहासिक पार्श्वभूमी, शिक्षणाचा धाराशिवचा वाटा आणि एकूण ग्रंथ चळवळीचा आढावा घेतला, त्यांनी सोशल मिडीयाचाही आढावा घेतला आणि आजची पिढी वाचते ही गोष्ट सोदाहरण स्पष्ट केली. ग्रंथ हे कायम माणसाच्या बौध्दीक उन्नतीसाठी काम करणारे साधन आहे, त्यामुळे ते अनंत आणि अक्षय असल्याचे सांगून त्यांनी सोशल मिडीया हे सुध्दा बौध्दिक आणि माहितीचे मोठे भांडार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालयाचे विभागीय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले.

           तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडीचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार गणेश माळी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, नायब तहसीलदार  राजकुमार केलूरकर आदी उपस्थित होते.

                                *****

 
Top